छत्रपती संभाजीनगर: मराठीसाहित्यविश्वातील मान्यवर साहित्यिक आणि ज्येष्ठ लेखक रावसाहेब रंगनाथ बोराडे तथा रा.रं. बोराडे (वय ८४) यांचे मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता वृद्धापकाळाने एमजीएम रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुलभा बोराडे, मुली प्रेरणा, तृप्ती, मंजूश्री, अरुणा आणि नातवंडे असा परिवार आहे.
रा.रं. बोराडे हे ग्रामीण साहित्य चळवळीतील महत्त्वाचे स्तंभ होते. त्यांचे लेखन केवळ करमणुकीसाठी नव्हते तर समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारे होते. त्यांची लेखणी शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या व्यथा मांडणारी होती. रा.रं. बोराडे यांनी मराठवाड्यातील ग्रामीण जीवनाचे अत्यंत समर्पक आणि हृदयस्पर्शी चित्रण आपल्या लेखणीतून केले. त्यांनी आपल्या लेखन प्रवासाची सुरुवात इयत्ता १० वीत असतानाच केली. त्यांच्या 'पाचोळा' या कादंबरीवर एमजीएम विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फिल्म आर्ट्सने चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यांच्या इतर तीन कादंबऱ्यांवरही चित्रपट निर्मिती झाली आहे. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे २०२४ करिता ‘विं.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला होता. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वाची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या साहित्यकृती नव्या पिढीला प्रेरणा देत राहतील.
मराठवाडी बोलीभाषेचा साहित्यात प्रभावी वापर१९५७ साली त्यांच्या पहिल्या कथेला प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर त्यांचा लेखनप्रवास अखेरपर्यंत सुरूच राहिला. त्यांनी आपल्या लेखणीतून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण जीवन आणि संस्कृतीचे दर्शन घडवले. त्यांच्या ‘पाचोळा’ आणि ‘वसुली’ या कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला नवा आयाम दिला. त्यांच्या साहित्यशैलीत साधेपणा असूनही ती वाचकांना अंतर्मुख करणारी होती. त्यांच्या कथांमध्ये ग्रामीण जीवनाच्या संघर्षाचे प्रतिबिंब उमटले होते. विशेषतः मराठवाडी बोलीभाषेचा त्यांनी आपल्या साहित्यात प्रभावी वापर केला.
साहित्यकृती आणि वाङ्मयीन योगदानरा.रं. बोराडे यांच्या साहित्यात ग्रामीण जीवनाचे विविध पैलू प्रभावीपणे प्रकट झाले आहेत. पाचोळा, आमदार सौभाग्यवती, नातीगोती, बुरुज, पेरणी ते ताळमेळ, मळणी, वाळवण, राखण, गोधळ, माळरान, बोळवण, वरात, फजितवाडा, खोळंबा, हेलकावे, कणसं आणि कडबा, वसुली या साहित्यकृती गाजल्या.
शैक्षणिक आणि सामाजिक कार्यरा.रं. बोराडे यांनी वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळला. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालय आणि परभणीच्या शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्रिय होते. त्यांनी अनेक साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली असून, १९८९ मध्ये हिंगोली येथे भरलेल्या १७ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.
पुरस्कार आणि सन्मानमहाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. त्यांना विं.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कारासह अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यापैकी काही महत्त्वाचे पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत:- विं.दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन)- उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती राज्य पुरस्कार (५ वेळा)- फाय फाउंडेशन पुरस्कार- महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाची सन्मानवृत्ती- यशवंतराव चव्हाण पुरस्कार, अंबाजोगाई- आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार- मराठवाडा सेवा गौरव पुरस्कार- भैरूरतन दमाणी पुरस्कार- जयवंत दळवी पुरस्कार- मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार