लातूर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने वाढत्या उन्हापासून थोडासा दिलासा देणाऱ्या शहाळ्यांच्या (नारळ पाणी) विक्रीत मोठी वाढ झाली आहे. दिवसाकाठी हजारो शहाळ्यांची विक्री होत असल्याने शहाळ्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या वाढत्या उन्हापासून थोडासा दिलासा मिळावा, तसेच दवाखान्यातील रुग्णांचेही आरोग्य चांगले रहावे, या दृष्टिकोनातून शहाळ्यांच्या विक्रीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लातूर जिल्ह्यात शहाळ्यांची विक्री करणारे दीडशे व्यावसायिक असून, प्रत्येक व्यावसायिकाकडून दिवसाकाठी १५० ते २०० शहाळ्यांची विक्री होत आहे. बंगळुरु, म्हैसूर, तामिळनाडू या भागातून शहाळ्यांची आवक होत असून, उन्हाळ्यात शहाळ्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यामध्ये १० रुपयाला विक्री होणारे हिरवे नारळ उन्हाळ्यामध्ये २५ रुपयाला एक नग याप्रमाणे विक्री केले जात आहे. पण हे कोवळे नारळ नागरिकांच्या आरोग्यासाठी गुणकारी व लाभदायक असल्यामुळे भाव दुपटीने वाढला असला, तरी याच्या विक्रीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. (प्रतिनिधी)
शहाळ्यांचे भाव दुपटीने वधारले
By admin | Updated: April 27, 2015 01:00 IST