औरंगाबाद : रावणाच्या पुतळ्याचे दहन करून दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी आणि बालाजीच्या रथासोबत सीमोल्लंघन करून विजयादशमी साजरी करण्याकरिता औरंगाबादकर सज्ज झाले आहेत. उद्या शुक्रवार, दि.३ आॅक्टोबर रोजी दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कर्णपुरा येथील बालाजी मंदिरासमोर बालाजीचा रथ रंगरंगोटी करून सजविण्यात आला आहे. औरंगाबादकर हा बालाजीचा रथ ओढत सीमोल्लंघन करतात. याशिवाय चौराहा येथून बालाजीची पालखी व राजाबाजार येथून बालाजीची शोभायात्रा काढण्यात येते. सिडको एन-७ येथील रामलीला मैदानावर सायंकाळी रावणदहन करून विजयोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही हा सण साजरा करण्यासाठी जय्यत तयारी झाली आहे.राजाबाजार येथील बालाजी मंदिरातून सकाळी ९ वाजता शोभायात्रा निघणार आहे. चौराहा येथील हरलाल श्यामलाल बालाजी मंदिरातील बालाजीच्या पंचधातूच्या मूर्तीची पालखी सायंकाळी ६ वाजता निघणार आहे. कर्णपुरा येथील बालाजी मंदिरात सायंकाळी ६ वाजता बालाजीची आरती होऊन रथयात्रेला सुरुवात होईल. हा रथ पंचवटी चौकापर्यंत येऊन सीमोल्लंघन होईल व पुन्हा रथ मंदिरात आणला जाईल. सिडकोत रावणदहन सिडको एन-७ येथील रामलीला मैदानात ६५ फूट उंच रावणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. उत्तर भारत संघाच्या वतीने येथे रावणदहनाचे आयोजन करण्यात येते. सायंकाळी ४.३० वाजेपासून येथे राम-रावणाचे युद्ध सुरू होणार आहे. रामाची भूमिका संदीप सटोते, तर रावणाची भूमिका हरिशंकर मोरिया करीत आहेत. सायंकाळी ७ वाजता रावणदहन करण्यात येणार आहे. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. या रावणदहनाने संगीत रामलीलेचीही सांगता होणार आहे.
सीमोल्लंघनाची तयारी पूर्ण
By admin | Updated: October 3, 2014 00:39 IST