लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रविवारी जिल्हाभरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे़ मान्सूनचा पाऊस झाल्यानंतर पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत़ रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते़ शहरात दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरू होता़ सायंकाळच्या सुमारास भुरभूर पावसाला सुरुवात झाली़ रात्री उशिरापर्यंत पावसाची भुरभूर सुरू होती़ पूर्णा तालुक्यात दुपारी १़३० वाजण्याच्या सुमारास अर्धा तास जोरदार पाऊस झाला़ जिंतूर तालुक्यातही दुपारपासून पावसाची भुरभूर सुरू आहे़ सोनपेठ तालुक्यामध्ये सकाळी ११़३० ते १२ यावेळेत जोरदार पाऊस झाला़ सेलू तालुक्यामध्ये दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला़ कुपटा, वालूर येथे जोरदार पाऊस बरसला़ बोरी येथेही सायंकाळी ६़४५ च्या सुमारास एक तास पाऊस झाला़ पाथरी, गंगाखेड, मानवत तालुक्यातही पावसाने हजेरी लावली आहे़ एकंदर, या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असून, पेरणीपूर्व कामांना वेग आला आहे़ शनिवारी रात्री झालेल्या पावसाची नोंद महसूल प्रशासनाने घेतली असून, परभणी तालुक्यात सर्वाधिक २८़२५ मिमी पाऊस झाला आहे़ पालम तालुक्यात १२़३३, पूर्णा २२़६६, गंगाखेड १४, सोनपेठ निरंक, सेलू १८, पाथरी निरंक, जिंतूर ३ आणि मानवत तालुक्यात ९ मिमी पाऊस झाला़
मान्सूनपूर्व पावसाची जिल्हाभरात दमदार हजेरी
By admin | Updated: June 11, 2017 23:49 IST