पाथरी : भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाथरी तालुक्यातील फुलारवाडी पाणीपुरवठा समितीला जिल्हा परिषदेकडून उपलब्ध झालेल्या ५ लाख ७४ हजार रुपये निधीतील १ लाख १५ हजार रुपये ग्रामसेवकाने सिंगल खात्यातून परस्पर लाटल्याचा प्रकार समोर आला आहे़ समितीच्या तक्रारीनंतर याप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे़भारत निर्माण योजनेंतर्गत पाथरी तालुक्यातील फुलारवाडी येथे तीन वर्षांपूर्वी जवळपास ४० लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती़ यासाठी गावस्तरावर पाणीपुरवठा समितीही स्थापन झाली आणि त्यानंतर योजनेचे काम सुरू झाले़ समितीला मिळणारा निधी ग्रामपंचायमार्फत देण्यात येतो़ समितीच्या नावे मंजूर झालेला ५ लाख ७४ हजार ४८६ रुपयांचा धनादेश संबंधित गावचे तत्कालीन ग्रामसेवक पी़ आऱ चव्हाण यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त खात्यात जमा न करता सिंगल खात्यामध्ये जमा केला़ यातील ४ लाख ६० हजार रुपये ग्रामसेवकाने समितीकडे वर्गही केले़यातील उर्वरित १ लाख १५ हजार रुपये रक्कम ग्रामसेवकाने स्वत:च्या स्वाक्षरीने वेगवेगळ्या तारखेमध्ये परस्पर उचलले़ हा प्रकार समितीच्या लक्षात आल्याने समितीने ग्रामसेवक पी़ आऱ चव्हाण यांच्या विरोधात पाथरी पंचायत समितीकडे लेखी तक्रार दाखल केली़ या तक्रारीनंतर पंचायत समितीच्या वतीने पाणीपुरवठा समिती आणि ग्रामपंचायतीच्या खात्याचे उतारे काढून आणल्यानंतर ग्रामसेवकाने ही रक्कम परस्पर उचलल्याचा प्रकार निदर्शनास आला़ तक्रारी वाढल्यानंतर ग्रामसेवकाने उचललेली रक्कम समितीच्या खात्यावर भरणा करून यातून पळ काढण्याचा मार्ग शोधला़ (वार्ताहर)सिंगल खात्यात पैसे जमा कसे?पाणीपुरवठा योजनेसाठी देण्यात येणारा निधी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकाच्या संयुक्त खात्यातूनच दिला जातो़ परंतु, येथील ग्रामसेवकाने असे न करता सिंगल खात्यामध्ये हा धनादेश जमा केला कसा? असा प्रश्न आता निर्माण झाला असून, याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे़ आज तपासणीसमितीच्या खात्यातील या रक्कमेबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चव्हाण यांनी चौकशी सुरू केली आहे़ याबाबत १४ जुलै रोजी ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांची तपासणी करून चौकशी केली जाणार असल्याची माहिती विस्तार अधिकारी चव्हाण यांनी दिली़ सर्वच व्यवहार सामान्य खात्यातूनपाणीपुरवठा समितीला देण्यात येणारा निधी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संयुक्त खात्यातूनच जाणे अनिवार्य असतानाही या योजनेमध्ये उपलब्ध झालेला जवळपास ३५ लाख रुपयांचा निधी ग्रामसेवकाच्या सामान्य खात्यातूनच उचलला गेला आहे़ यामुळे ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे़ दरम्यान, या गावच्या ग्रामसेवकाची इतरत्र बदली झाल्याने त्याच्याकडील रेकॉर्ड मात्र चौकशी अधिकाऱ्याला वेळेत उपलब्ध होईल की नाही, याबाबत शंकाच आहे़
फुलारवाडीच्या ग्रामसेवकाचा प्रताप
By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST