तुळजापूर : चळवळीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतो आहे. मात्र, साहित्य संमेलने याबरोबरच विविध जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे मागील काही वर्षांत समाजातील एकोपा वाढत असून, हा सकारात्मक बदल येणाऱ्या काळातही वेगाने होत राहील, असा विश्वास खा. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तुळजापूर येथे आयोजित २२ व्या अखिल भारतीय मराठी नवोदित साहित्यस संमेलनाच्या समारोप प्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष शरद गोरे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह दशरथ यादव, राजाभाऊ ओव्हाळ, आनंद पांडागळे आदींची उपस्थिती होती. नवोदितांचे हे साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने बहुजन विचारांचे असून, आम्ही ब्राह्मणविरोधी नाही तर, जाती-धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या विचारांच्या विरोधात असल्याचे आठवले यावेळी म्हणाले. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही कार्यरत असून, हाच विचार ही परिषद मोठ्या ताकदीने पुढे नेत असल्याचे गौरवदगारही आठवले यांनी काढले. साहित्य म्हणजे केवळ स्वप्नरंजन नव्हे तर समाजातील समस्यांची उत्तरे अशा संमेलनात सापडली पाहिजेत. विविध प्रश्नांवर वैचारिक चर्चा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष खोत यांचेही यावेळी भाषण झाले. पृथ्वी ही शेषनागावर उभारलेली नाही तर तर शेतकरी, श्रमिकांच्या घामावर उभी राहिली असल्याचे सांगत हाच शेतकरी आज अनेक संकटात सापडल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणीही सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली. (वार्ताहर)
समाजात सकारात्मक बदल
By admin | Updated: May 23, 2015 00:38 IST