उंडणगाव : प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २२ गावांची एकूण लोकसंख्या ५४,३४९ आहे. त्यापैकी ४५ वर्षे वयोगटातील ३४ हजार लोकसंख्येचा समावेश होतो. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत फक्त २०१५ नागरिकांनी लस घेतली आहे. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात नागरिक लस का घेत नाहीत, का लसीकरणाविषयी जनजागृती करण्यास आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन, महसूल विभाग यापैकी कोण कमी पडले ? असा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत. या बाबीकडे वरिष्ठ स्तरावरील प्रशासनाकडून लक्ष देण्याची गरज आहे.
सध्या देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे उंडणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २२ गावांची लोकसंख्या येथील एकूण लोकसंख्या ५४,३४९ इतकी आहे. २ वैद्यकीय अधिकारी व २२ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. ४५ वयोगटातील ३४ हजार लोकसंख्या असलेल्या नागरिकांपैकी दोन हजार नागरिकांना लस दिली गेली. तर अजूनही ३२ हजार नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत.
त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लसीकरणकडे नागरिकांनी पाठ फिरवली का, या लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रशासन कमी पडले का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लसीकरण मोहीम पुन्हा जोमाने सुरू होईल
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना सपकाळ यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की़ वरिष्ठांकडून लस ही टप्प्याटप्प्याने मिळू लागलेली आहे. तरीही पाहिजे त्या प्रमाणात नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद द्यायला हवा होता, तो दिसून आला नाही. लसीचा साठा उपलब्ध झाल्यावर लसीकरण मोहीम पुन्हा जोमाने सुरू केली जाईल.