शरद वाघमारे, नांदेडभारुड कलेच्या माध्यमातून अनिष्ठ रुढी- परंपरा, अंधश्रद्धा निर्मूलनासह सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सुधारकांकडून पूर्वापार प्रयत्न झालेत़ हा वारसा कायम ठेवत युवक महोत्सवात भारुडातून मनोरंजन करत विद्यार्थी कलावंतांनी आजच्या प्रश्नांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले़स्वारातीम विद्यापीठ व इंदिरा कॉलेज आॅफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवात एकाहून एक सरस भारुड सादर झाले़ कंधार येथील शिवाजी कॉलेजच्या संघाने ‘फॅशनने वेड लावलं’ हे भारूड सादर केले़ यात त्यांनी शेतकरी आत्महत्या, फॅशनमुळे तरूणाई कशी बिघडली व आजचे नेते पैशाकडे बघून कसे वेळप्रसंगी पक्ष बदलतात याचा समाचार घेतला़ या भारूडात प्रदीप वाघमारे, सचिन कांबळे, गणेश राठोड, भास्कर, ओमकार, बापूराव बोंबले, शेख जहीर यांनी सहभाग घेतला होता़ औराद शहाजनी येथील दिनानाथ मंगेशकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फेसबूक, व्हॉट्स अॅप याचा वाढता वापर, विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीमुळे परीक्षार्थ्यांची घालमेल, निवडणुकीत उमेदवार योग्य द्यावा असा संदेश दिला़ यात कृष्णा पांचाळ, बालाजी तळेगाव, राजकुमार सूर्यवंशी, सिद्राम जाधव, अमोल पांचाळ यांनी सहभाग नोंदवला़ डोळ्यानं दिसतया, बोलाचयं नसतय बया़़़ या भारुडातून श्री दत्त महाविद्यालय, हदगाव येथील विद्यार्थ्यांनी राजकीय नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या भ्रष्टाचारावर प्रहार केला़ तसेच डेंग्यू आजार, शिक्षणाचा घसरता दर्जा आदी विषयावर प्रबोधन केले़ यात आकाश जमदाडे, गजानन शिंदे, ओमकार बरगळ, पवन सदावर्ते, लहू गायकवाड आदींनी सहभाग घेतला़ हु़जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगरच्या विद्यार्थ्यांनी सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला हे भारूड सादर केले़ यात अमोल येटलेवाड, परमेश्वर कऱ्हाळे, प्रमोद हणवते, गंगाधर बोनलेवाड, अविनाश बोंपिलवार आदींनी सहभाग नोंदविला़ यशवंत महाविद्यालयाच्या सोमेश शेलापूरे, किरण सावंत, साईनाथ टाले, गोविंद वाघमारे, विनोद गोडबोले, योगेश गच्चे, विष्णूदा उमाटे यांनी कायम राव बाता हाण्ता अन् म्हणलं तर म्हणता हे निवडणुकीवर प्रकाश टाकणारे भारूड सादर केले़ घरकुल योजना, राजकीय उमेदवारांचे पक्षांतर आदी सामाजिक समस्यांवर फटके मारले़ एकूणच भारूड कला प्रकारातून विद्यार्थ्यांनी प्रचलित सामाजिक प्रथेविरूद्ध परिवर्तनाचे असूड ओढत सामाजिकतेचा जणू संदेशच दिला़‘सहयोग-२०१४’मध्ये रविवारी सकाळी ७ वाजेपासून कलाप्रकारचे सादरीकरण होणार आहे़ यामध्ये वासुदेव, मूकअभिनय , वक्तृत्व, शास्त्रीय गायन, रांगोळी, पोवाडा, जलसा, पोस्टर मेकिंग, शास्त्रीय तालवाद्य, गोंधळ, व्यंगचित्रकला, शास्त्रीय सुरवाद्य, एकांकिका, फोक आर्केस्ट्रा या कलाप्रकारांचा समावेश आहे़ मुख्य मंचासह सहा मंचावर सदरील कार्यक्रम चालणार आहेत़
भारुडातून अनिष्ठ रुढीवर प्रहार
By admin | Updated: September 28, 2014 00:09 IST