लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दहावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकचे मोफत शिक्षण मिळणार आहे. शिक्षण विभागाने कौशल्य सेतू अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील नापास झालेल्या तीन हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. याचे अर्ज स्वीकारण्यास सुरूवातही झाली असून दोन दिवसात जि.प.कडे १५० अर्ज दाखल झाले आहेत.गत काही वर्षांपासून जिल्ह्यात कॉपीमुक्तीची चळवळ यशस्वीपणे राबविली जात आहे. यामुळे गुणवत्तेची आकडेवारी दर्जेदार आहे. तसेच अभ्यासू विद्यार्थ्यांना न्याय मिळत आहे. अभ्यासू विद्यार्थी या कॉपीमुक्तीमुळे यशोशिखर सहज पार करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. परंतु काही विद्यार्थी आजही परिक्षांमध्ये अनुत्तीर्ण होतात. त्यांचेही नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्यांना अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाण्यापासून वाचले होते. दरम्यान, शिक्षण विभागाने आणखी वाढ करून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कौशल्य सेतू अभियानांतर्गत यावर्षी दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रनिकेतनचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. त्या दृष्टीकोणातून बीड जिल्हा परिषदेकडून नापास विद्यार्थ्यांचे अर्ज मागविले जात आहेत.बुधवारपर्यंत १५० अर्ज आल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी मोहन काकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दहावीतील नापासांना पॉलिटेक्निकचे शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2017 23:22 IST