औरंगाबाद : तू आमच्यासोबत का राहत नाही, असे विचारात पोलीसपुत्राने दोन साथीदारांच्या मदतीने एकास चाकूने भोसकल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री रामनगर, एन २ येथील एका रुग्णालयाजवळ घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.
ऋतिक शिवाजी नेमाणे (२२, रा. म्हाडा कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. ऋतिक हा शुक्रवारी बहिणीच्या घरी साउथ सिटी, वाळूज महानगर येथे गेला होता. रात्री १२ वाजेच्या सुमारास तो दुचाकीने घरी जात असताना रामनगर येथील सह्याद्री हॉस्पिटलजवळ त्याच्या ओळखीचा मयूर मुंढे (रा. म्हाडा कॉलनी) हा दोन मित्रांसह उभा दिसला. मयूरने त्याला आवाज देऊन बोलावले. ऋतिक त्यांना बोलण्यासाठी थांबला असता. मयूरने त्याला तू माझ्यासोबत का राहत नाहीस, मस्ती आली का, असे म्हणून शिवीगाळ करू लागला. ऋतिक त्याला समजावून सांगत असताना दोन जणांनी त्याचे हात पकडले तर तिसऱ्याने त्याच्या पोटात चाकू खुपसला. या घटनेत तो गंभीर जखमी होऊन पडल्यावर आरोपी पळून गेले. घटनेची माहिती कळताच त्यांच्या नातेवाइकांनी ऋतिकला रुग्णालयात दाखल केले. त्याला आठ टाके देण्यात आले. या घटनेविषयी रात्री उशिरापर्यंत मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.
=====(===
मयूर हा पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असून तो कॅनॉटमध्ये कॅफे चालवितो, असे जखमीच्या नातेवाइकांनी सांगितले. आरोपीविरुद्ध कठोर कलमांनुसार कारवाई पोलिसांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
=============
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि डॉक्टरांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर घटना अधिक स्पष्ट होईल. जखमांचे स्वरूप पाहून कोणती कलमे लावून गुन्हा नोंदवावा हे कळेल, असे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी सांगितले.