औरंगाबाद : सिडको बसस्थानक चौकातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल महिलेच्या पतीला गुन्हे शाखेचा पोलीस असल्याचे सांगून बाहेर नेले. तेथे त्यांची झडती घेण्याची बतावणी करून ११ हजार रुपये काढून घेतल्याची घटना मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. सीताराम तुकाराम भांडे (५५, वडोद कान्होबा, ता. खुलताबाद), असे लुबाडणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सीताराम भांडे यांची पत्नी जालना रोडवर सिडको बसस्थानक चौकातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपासून दाखल आहे. तिच्यासोबत तिचे पती सीताराम भांडे दवाखान्यात थांबलेले होते. मंगळवारी रात्री पत्नीच्या खाटेशेजारी खाली झोपले असताना तेथे एक जण गेला. मी गुन्हे शाखेचा पोलीस असल्याचे सांगत त्यांना त्याने दवाखान्याबाहेर नेले. रोडवर गेल्यानंतर तुमच्या खिशात गांजा व गुटखा असल्याची माहिती मिळाली आहे. तुमची झडती घ्यावी लागेल, अशी बतावणी केली. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या अॅपेरिक्षात बसलेले दोघे जण त्यांच्याजवळ गेले. तिघांनी सीताराम भांडे यांची झडती घेण्याचा बनाव करीत खिशातील ११ हजार रुपये काढून घेतले. घाबरलेल्या सीताराम यांनी तिघा जणांच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर ते तिघे जण पळून गेले. आपली फसवणूक झाल्याची भांडे यांना कल्पना आली. दुसर्या दिवशी त्यांनी मुकुंदवाडी ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, फौजदार घुले पुढील तपास करीत आहेत.
तोतया पोलिसाने रुग्ण महिलेच्या पतीला गंडवले
By admin | Updated: May 23, 2014 01:06 IST