सेनगाव : बनावट नंबर प्लेट लावून सोयाबीन लंपास प्रकरणातील पोलिसांनी मुद्देमालासह ट्रक ताब्यात घेतला आहे; परंतु या प्रकरणातील मुख्य आरोपी शोधण्यात पोलिसांना अपयश येत असून दहा दिवसानंतरही मुख्य आरोपी पोलिसांना सापडत नसल्याची स्थिती आहे.ट्रकला बनावट नंबर प्लेट लावून येथील आडत व्यापाऱ्याला गंडवित ११ लाख १४ रुपये किमतीचे २७५ पोते सोयाबीन लंपास केल्याची घटना ३ जुलै रोजी घडली होती. या प्रकरणात प्रारंभी सेनगाव पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित सोयाबीन पळविलेल्या ट्रकसह मुद्देमाल तीन आरोपींना अटक केली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे, परंतु या प्रकरणातील मुख्य आरोपी मात्र अद्याप फरारच आहे. पोलिस तपासात मुख्य आरोपींची नावे स्पष्ट झाली असली तरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यात सपशेल अपयश आले आहे. वाहनांना बनावट नंबरप्लेट लावून नियोजित पद्धतीने गंडा घालणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार गजानन सखाराम पवार (रा. साखरखेडा, जि. बुलडाणा), सोयाबीन खरेदी करणारा व्यापारी रवींद्र महादेव काळे (रा. खामगाव) व ट्रक चालक नारायण भीमराव जाधव (रा. चिंचोली, ता. लोणार) हे प्रमुख तीन आरोपी फरार आहेत. प्रकरणाचा सुरूवातीला वेगाने तपास करण्यात आला; परंतु त्यानंतर मुख्य आरोपी शोधासाठी पोलिस यंत्रणा कमालीची उदासीन असल्याची स्थिती आहे. या तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी येवते यांच्याशी संपर्क साधला असता मुख्य आरोपीची शोध मोहीम चालू आहे. लवकरच प्रमुख आरोपींना अटक करण्यात येईल, असे सांगितले. या प्रकरणातील आरोपींनी महाराष्ट्रासह विविध राज्यात अनेकांना गंडविले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
पोलिसांना मुख्य आरोपीचा शोध लागेना
By admin | Updated: July 19, 2014 00:46 IST