जालना : बहुचर्चित जालना पीपल्स को आॅपरेटिव्ह बँकेतील बनावट सोने तारण ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी ३९ व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. असे असले तरी अद्याप पोलिसांनी कुणालाही अटक केली नसल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला असून, काही कागदपत्रे ताब्यात घेतले आहेत. दि जालना पीपल्स को आॅपरेटिव्ह बँकेच्या बदनापूर शाखेत चक्क शेतमजूर, हमालांच्या नावे बनावट खाते उघडून त्यांच्याच नावावर बनावट सोने तारण ठेवून १ कोटी ६२ लाखांचे कर्ज उचलून बँकेला चुना लावणाऱ्या जालना आणि बदनापूर येथील बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ३९ प्रतिष्ठित व्यापाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश बदनापूर न्यायालयाने मंगळवारी दिले. त्यानंतर बदनापूर पोलीस ठाण्यात संबंधित ३९ व्यापाऱ्यांवर बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले. सुरुवातीला सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एस. बोलकर यांच्याकडे देण्यात आला. परंतु तपासात गती न आल्याने पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांच्याकडे वर्ग केला. त्यानंतर बारी यांनी बदनापूर शाखेतून काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यत घेतले. त्या त्या काळातील बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक, शाखाधिकारी, कर्मचारी आदिंची या प्रकरणात काय भूमिका होती. संबंधित शाखाप्रमुखाने किती रकमेच्या आणि कोणाच्या नावाने पैसे काढले. त्या विड्रॉलवरील स्वाक्षऱ्या आदीची पडताळणी करण्यासाठी कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहे. तर उर्वरित कागदपत्रे जालना येथील मुख्य शाखेतून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कागदपत्रांची पोलिसांकडून तपासणी
By admin | Updated: March 4, 2017 00:22 IST