नेमके काय आहे प्रकरण
सातारा पोलीस ठाण्याच्या कर्मचारी भैरवी वासुदेव बागूल यांनी फिर्याद दिली होती की, पोलीस वाहनचालक पदाच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार बसवून राज्य शासनाची फसवणूक केल्याबाबत आकाश भाऊलाल राठोड (वय २२, रा. बेगानाईक तांडा, पोस्ट आडगाव, ता. औरंगाबाद), पूजा रामदास दिवेकर (२४, रा. टीव्ही सेंटर) आणि भागवत दादाराव बरडे (२१, रा. फत्तेपूर, ता. भोकरदन) यांना यापूर्वी अटक करण्यात आली. याच गुन्ह्यातील चौथा आरोपी सचिन गोकुळ गोमलाडू (राजपूत) (२२, रा. काऱ्होळ, गोलटगाव, ता. जि. औरंगाबाद) याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली.
सचिन गोमलाडू याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी न्यायालयास विनंती केली की, डमी उमेदवार परीक्षेला बसविण्याचे मोठे रॅकेट कार्यरत असून, यातील अनेक आरोपींना अटक करावयाची आहे. या गुन्ह्यात जप्त केलेले मोबाईल, स्पाय माईक असे विविध आधुनिक साहित्य आरोपी सचिनने खरेदी केले होते. आरोपीने डमी उमेदवार बसवून किती व कुठेकुठे गुन्हे केले, कोणकोणत्या परीक्षा दिल्या, आदी बाबींचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. ती मान्य करून न्यायालयाने आरोपीला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.