लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : येथील पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली असून कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या ७७ पोलीस कर्मचाऱ्यांना अद्यापही निवासस्थानेच नसल्याने भाड्याच्या खोल्यांमध्ये राहावे लागत आहे. येथील पोलीस ठाण्यात १३२ मंजूर पदांपैकी पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, तीन फौजदार व ९५ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांसाठी १९८८ सालच्या मंजूर पद संख्येनुसार एक पोलीस अधिकारी व २२ पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आहेत. सध्या पोलीस वसाहतीची दुरवस्था झाली असून काही कर्मचाऱ्यांनी जागा कमी पडत असल्याने निवासस्थानासमोर पत्र्याचे शेड टाकले आहे़ तसेच पावसाचे पाणी खोल्यांमध्ये गळत आहे़ अनेक कर्मचाऱ्यांनी छताचे पाणी रोखण्यासाठी मेणकापडाचे आच्छादन टाकले आहे. वसाहतीमध्ये सांडपाणी जमा होत असून पावसामुळे पुन्हा हे घाण पाणी निवासस्थानामध्ये येत आहे. घाण पाणी बाहेर काढताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे़ त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी तर स्वत:च खर्च करीत निवासस्थानासमोर भराव टाकून नालीतील पाणी रोखण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षक भिंतही पडली असून प्रवेशद्वारास गेट नसल्याने मोकाट जनावरांचा या परिसरात वावर असतो. सध्या १०० पोलीस कर्मचाऱ्यापैकी २२ कर्मचाऱ्यांनाच या निवासस्थानामध्ये राहता येते. उर्वरित कर्मचाऱ्यांना किरायाच्या खोलीमध्ये रहावे लागत आहे. त्यामुळे भाड्यापोटी नाहक जास्त रक्कम मोजावी लागते. शिवाय दर वेळेस खोल्या बदलाव्या लागत असल्याने त्रास सहन करावा लागतो.
गंगाखेडमध्ये पोलीस वसाहतीची दुरवस्था
By admin | Updated: June 25, 2017 23:23 IST