हिसोडा : भोकरदन तालुक्यातील हिसोडा (खुर्द) येथील नळ योजनेचे काम रखडल्याने ग्रामस्थांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावाला नळयोजनेसाठी वीजपंप बसविणे, विहिरीचे खोदकाम, अंतर्गत जलवाहिनी आदी कामांसाठी ५० लाख रूपये जि.प.कडून मंजूर आहेत. याला आता दीड वर्ष उलटून गेले आहे. परंतु अद्यापही योजनेचे काम पूर्ण झाले नसल्याने ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याने ग्रामस्थांत रोष आहे. गावाची चार हजार लोकसंख्या आहे. गावाला पिण्याच्या व्यवस्था व्हावी यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून विहीर खोदकाम, अंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी आणि देखभाल दुरूस्तीसाठी आणि गावातील जलकुंभाच्या दुरूस्तीसाठी ५० लाख रूपये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहेत. परंतु जलवाहिनी तसेच विहिरीचे खोदकाम आणि जलकुंभ दुरूस्तीचे कामे अद्यापही अर्धवटच असल्याने ग्रामस्थांचे पाण्याविना हाल सुरू आहेत. परिसरात सध्या उन्हाची तीव्रता असल्याने पाण्यासाठी महिलांची भटकंती वाढली आहे. पेयजल योजनेतून खोदण्यात आलेल्या विहिरीत मुबलक पाणी आहे. परंतु अंतर्गत जलवाहिनीचे काम आणि जलकुंभाचे काम रखडल्याने पाणी असून, सुध्दा गावाला पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहे. सध्या गावाला अधिग्रहित केलेल्या विहिरीवरून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु त्याही विहिरीचे गावाला पाणी पुरेसे मिळत नाही. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन गावातील अर्धवट राहिलेल्या या योजनेची कामे पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. या विषयी राष्ट्रीय पेयजल योजनेचे ग्राम समितीचे अध्यक्ष के.टी जगताप म्हणाले, या योजनेतून विहीर खोलीकरणाचे काम बाकी आहे. जलकुंभाची दुरूस्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. गावातील विहिरीचे काही खोदकाम, अंतर्गत जलवाहिनीचे कामे बाकी आहेत. ते तात्काळ पूर्ण करण्यात येणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अभियंता गजानन जंजाळ म्हणाले. योजनेचे काम लवकरच पूर्ण होईल, असे सरपंच अश्विनी गोरे म्हणाल्या. (वार्ताहर)
पन्नास लाखांचा निधी मिळूनही योजना अपूर्ण!
By admin | Updated: April 8, 2017 23:44 IST