:ग्रामपंचायतीने नवीन जलवाहिनी टाकल्याने पाणी प्रश्न निकाली
वाळूज महानगर : जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन जलवाहिनी टाकण्यात आल्यामुळे कमळापूरवासीयांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून पाण्यासाठी नवीन ठिकाणावरून जोडणी दिल्याने गावाचा पाणीप्रश्न तूर्तास निकाली निघाला आहे.
२० हजार लोकसंख्या असलेल्या कमळापूरला एमआयडीसीकडून दररोज जवळपास १ लाख लिटरचा मात्र कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे जारचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागते. गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी त्रस्त नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे सतत पाठपुरावा केला होता. या तक्रारीनंतर सरपंच गजानन बोंबले, उपसरपंच प्रवीण दुबिले, ग्रामविकास अधिकारी बी. एल. भालेराव आदींनी पुढाकार घेऊन नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला होता. एमआयडीसीकडून नवीन ठिकाणावरून जलवाहिनी टाकण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर ग्रामपंचायतीने ५०० मीटरपर्यंत नवीन जलवाहिनी टाकली आहे. यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास निकाली निघाला आहे.