औरंगाबाद : विनातिकीट प्लॅटफॉर्म आणि रेल्वेगाड्यांमध्ये घुसणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर शुक्रवारी ‘दमरे’च्या अधिकाऱ्यांनी रेल्वेस्टेशनवर कारवाईचा बडगा उगारला. दिवसभर रेल्वेस्टेशन आणि विविध गाड्यांमध्ये प्रवाशांकडे तिकिटांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात तब्बल ३३४ फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ६५ हजार ४९५ रुपये वसूल करण्यात आले. दक्षिण मध्य रेल्वेच्या विशेष पथकातर्फे शुक्रवारी रेल्वेस्टेशनवर प्रवाशांकडे अचानक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. रेल्वेच्या विभागीय वाणिज्य व्यवस्थापक चार्ल्स हेरेंज आणि २५ तिकीट तपासनीस, २ आरपीएफ जवानांनी प्रवाशांकडे तिकिटाची तपासणी केली. विनातिकीट, जनरल तिकीट असताना आरक्षण बोगीतून प्रवास इ. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. सकाळी ६ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत प्रवाशांकडे तिकिटांची तपासणी करण्यात आली. १० रेल्वेगाड्यांमध्ये ही कारवाई झाली. औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या कारवाईत शुक्रवारी केलेली कारवाई सर्वात मोठी ठरल्याचे चार्ल्स हेरेंज यांनी सांगितले.
३३४ फु कट्या प्रवाशांना दंड
By admin | Updated: March 28, 2015 00:47 IST