पाचोड : कोरोनाची साथ आटोक्यात आली असली तरी ग्रामीण भागात निर्बंध लागू आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्यासाठी व्यापारी, कामगारांची कोरोना चाचणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी पाचोड ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला ऑनलाईन बैठकीत दिले. त्यानुसार पाचोडसह परिसरातील व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी सुरू करण्यात आली असून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने तपासणी करून घ्यावी, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पोहरेगावकर यांनी सांगितले.
नुकतेच जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सर्व तालुक्यातील आरोग्य विभागाची ऑनलाईन बैठक घेऊन सूचना दिल्या. याबाबत डॉ. पोहरेगावकर यांनी सांगितले की, वरिष्ठ कार्यालयातून अचानकपणे गावागावात भेटी देऊन कोरोना चाचणीचा आढावा घेतला जाणार आहे. ज्या व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली नाही. अशा लोकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे व्यापारी, नागरिकांनी न घाबरता कोरोना तपासणी करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या पुढाकाराने गुरूवारी पाचोड व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. तर सर्व व्यापारी व कामगारांची कोरोना चाचणी करावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी सुनील मेहेत्रे, राहुल नारळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित जैन, डॉ. दीपाली कुलकर्णी, गजानन काफरे, बाळासाहेब बोचरे, राहुल मेहेत्रे, दिनकर मापारी यांची उपस्थिती होती.
----
आरोग्य विभागाचे पथक प्रत्येक दुकानावर
पाचोड गावातील व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर आरोग्य विभागाचे पथक जाणार आहे. येथे आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरूवात झाल्यानंतर पाचोड परिसरातील ५,८०० नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना निदान त्वरित करता आले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तपासणी पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पोहरेगावकर यांनी केले.