सोयगाववरून वीज पुरवठा होणाऱ्या जरंडी उपकेंद्राला जोडणी करण्यात आलेल्या मुख्य वीजवाहिनीत बिघाड झाल्याने मंगळवारी मध्यरात्रीपासून जरंडीसह १५ गावांचा वीज पुरवठा १२ तास खंडित झाला होता. रात्री खंडित झालेल्या वीज पुरवठ्याकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने जरंडीच्या कोविड केंद्रातील ४४ रुग्ण उकाड्यामुळे होरपळून निघाले. यामुळे केंद्रात एकच गोंधळ उडाला होता. अखेरीस मंगळवारी पहाटे वीज वितरणच्या पथकाला माळेगाव-पिंपरी फाट्यावर मुख्य वीज वाहिनीत बिघाड आढळून आल्यावर दुपारी युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र या बिघाडामुळे अर्धी रात्र कोविड रुग्णांसाठी अंधाराची रात्र ठरली होती. आधीच ऑक्सिजनची उपलब्धता नसल्याने येथे रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यात वीज गेल्याने रुग्णांनी राग व्यक्त केला. वीज गेल्याने परिसरातील पंधरा गावांनाही याचा फटका बसला.
वीज पुरवठ्याअभावी कोविड केंद्रात रुग्णांची होरपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:05 IST