विजय मुंडे , उस्मानाबादलहान-लहान संकटांसमोर हात टेकणारे अनेकजण जागोजागी पहावयास मिळतात़ मात्र, जिल्हा रूग्णालयातील परिचारिका चंदुबाई बाबूराव खंदारे या कॅन्सरसारख्या आजारावर मात करून अहोरात्र रूग्णसेवा करीत आहेत़ मागील तीन वर्षापासून त्या जळीत विभागातील रूग्णांची सेवा करीत असून, त्यांनी लहानपणापासून कविता लिहिण्याचा छंद त्यांनी जोरासला आहे़ स्वलिखित कवितांमधून त्या मानसिकदृष्ट्या खचलेल्या रूग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत़उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयातील जळीत विभागात चंदुबाई बाबुराव खंदारे या परिचारिका म्हणून मागील तीन वर्षापासून कार्यरत आहेत़ तसे पाहता आजवर त्यांनी जवळपास ३० वर्षे रूग्णांची सेवा केली आहे़ उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयासह मुरूम, लातूर येथील रूग्णालयातही त्यांनी रूग्णसेवा केली आहे़ पती बाबुराव खंदारे हे पोलीस दलात कार्यरत होते़ त्यांच्या निधनानंतर चंदुबाई खंदारे यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली़ त्यांना दोन मुले असून, दोघांचेही शिक्षण सुरू आहे़ रूग्णांची सेवा करून त्यांना आजारातून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चंदुबाई खंदारे या परिचारिकेला मात्र, कॅन्सरसारख्या आजाराने घेरले़ प्रारंभी काहीसा ताण मनावर आला असला तरी संकटाला घाबरायचे नाही ! असा निर्धार करीत त्यांनी सोलापूर येथे केमोथेरपी करून घेतली़ कॅन्सरसारखा आजार झालेला असतानाही त्यावर मात करीत त्यांनी आपली रूग्णसेवा सुरू ठेवली आहे़ दोन्ही मुलांना चांगले शिक्षण देण्याबरोबरच जळीतग्रस्तांची सेवा करून त्यांना बरे करण्यासाठी त्या काम करीत आहेत़चंदूबाई खंदारे यांनी लहानपणापासूनच लिखानाची आवड जोपासली आहे़ या लिखानातून त्यांनी आजवर अनेक कविता, गिते लिहिली आहेत़ जळीत विभागात त्यांनी त्यांच्या विविध कविता हस्ताक्षरात लिहून चिटकाविल्या आहेत़ ‘भडका’या कवितेतून जळीतग्रस्तांची जनजागृती केली आहे़ तर ‘अमोल नेत्रदान’ या कवितेतून नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे़ ‘व्यसन’ या कवितेतून मानवा सोड ही नशा होईल तुझी दुर्दशाआले जवळ तुझे हे मरण सोडून दे ना तुझे हे व्यसनअसा का रे मानवा करतोस तू व्यसन दार ठोठावीत येईल तुझे हे मरणदार उघडशील तुझ्या या नशेतमरण येईल फारच खुशीत़़़या कवितेतून व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम सांगण्या प्रयत्न त्यांनी केला आहे़एकूणच कॅन्सरसारख्या आजारावर मात करून चंदुबाई खंदारे यांनी रूग्णसेवेचा घेतलेला वसा अविरत सुरू ठेवला आहे़कौटुंबिक जबाबदारी संभाळतानाच जोपासलेल्या कवितेच्या छंदातून त्या रूग्णांचे मनोधैर्य वाढविण्याचे महत्त्वपूर्ण कामही सुरू ठेवले आहे़ चंदूबाई खंदारे या परिचारिकेचे सुरू असलेले कार्य हे इतरांसाठी प्रेरणादायी असेच आहे़
कॅन्सरवर मात करीत रूग्णसेवा सुरूच
By admin | Updated: May 12, 2016 00:35 IST