छत्रपती संभाजीनगर : नॅशनल हायवे क्र. २११ सोलापूर ते धुळे या महामार्गावर असलेल्या असलेल्या कन्नड व चाळीसगावच्या मधील औट्रम घाटातील बोगद्याचे काम रद्द करण्याचा निर्णय होऊन वर्ष झाले आहे. साडेपाच ते ६ हजार कोटींवर बोगद्याच्या कामाचा खर्च गेल्यामुळे खर्चात कपात करण्याचा ‘घाट’ एनएचएआयने घातला. पुढे तेथे नवीन पर्याय शोधण्याच्या डीपीआरलाही एजन्सीअभावी ग्रहण लागले आहे. औट्रम घाटासाठी उपाय शोधून चौपदरी सुरक्षित रस्ता व आवश्यकता जेथे असेल, तेथे बोगदा करण्यात येईल. असे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी जुलै २०२२ मध्ये स्पष्ट केले होते. आजवर या पर्यायासाठी तीन वेळा डीपीआरसाठी निविदा मागविल्या, परंतु कुठलीही एजन्सी पुढे न आल्यामुळे औट्रम घाट व वाहतूक अधांतरी आहे.
२०११ मध्ये एनएच २११ या महामार्गाच्या कामासाठी सा.बां. विभागाकडून धुळे ते औरंगाबाद ते येडशी हा मार्ग एनएचएआयकडे औट्रम घाटासह हस्तांतरित झाला. सध्या घाट व तेथील वाहतूक रामभरोसेच असून मागील काही वर्षांपासून पावसाळ्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत. ६ हजार कोटींवर बोगद्याच्या कामाचा खर्च गेल्यानंतर एनएचएआयने पर्याय म्हणून चौपदरीकरण व गरज पडेल तेथे बोगदा असा पर्याय निवडला. मात्र, त्या संकल्पनेचा डीपीआरच तयार झाला नाही.
११ किलोमीटरचा घाट धोकादायककन्नडमार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील औट्रम ११ कि.मी.चा घाट वाहतुकीसाठी धोकादायक आहे. मागील काही वर्षांपासून त्या घाटाला पर्यायी मार्ग नसल्यामुळे रोज १२ हजारांहून अधिक वाहनांचा राबता तेथून होत आहे. २०१७ च्या पावसाळ्यात झालेल्या ७० मि.मी. पावसाच्या तडाख्याने घाटात साडेतीन मीटरपर्यंतचे भूस्खलन होऊन दरड कोसळली. २०१८, २०१९ आणि २०२० मध्येही कमी-अधिक प्रमाण दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. २०२१-२२ मध्ये तर साडेपाच मीटरहून अधिक भूस्खलन झाले.
प्रतिसादच नाहीबोगद्याला नवीन पर्याय काय, याबाबत डीपीआरसाठी तीनदा निविदा मागविल्या. मात्र, एजन्सीने प्रतिसाद दिला नाही. पर्याय कसा असावा, यासाठी डीपीआर करायचा आहे. त्याला किती खर्च लागेल, हे डीपीआरनंतरच समजेल.-रवींद्र इंगोले, प्रकल्प संचालक, एनएचएआय