तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर झाले असून गावागावांत राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आरक्षणाचा फटका अनेक इच्छुक दिग्गजांना बसला असून, या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.गदाना गटातील काँग्रेसच्या विद्यमान सदस्या उज्ज्वला अनिल श्रीखंडे, वेरूळ गटातील मनसेचे सदस्य शैलेश क्षीरसागर, बाजारसांवगी गटातील काँग्रेसच्या शोभाताई वसंतराव नलावडे या तिन्ही विद्यमान सदस्यांचे गट आरक्षित झाल्याने यांचा पत्ता कट झाला आहे.गदाना गट ओबीसी पुरूषासाठी राखीव झाल्याने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल श्रीखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सुनीता चव्हाण, राष्ट्रवादीचे विलास चव्हाण, माजी सभापती महेश उबाळे, शिवसेनेचे राजू वरकड, कारभारी जाधव यांचे जि.प. निवडणूक लढविण्याचे स्वप्न स्वप्नच राहीले आहे.वेरूळ जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जगन्नाथ खोसरे, शिवसेनेचे सुनील औटे पाटील, राष्ट्रवादीचे भीमराव खंडागळे यांची घोर निराशा झाली असून या गटातून ते आता आपापल्या पत्नीला उभे करतील, अशी शक्यता आहे. बाजार सांवगी जि.प.गट हा सर्वसाधारण (ओपन) निघाल्याने या गटात मोठी रंगत लढत होणार आहे. शिवसेनेच्या वतीने अंबादास नलावडे, गणेश आधाने, भाजपाकडून माजी सभापती कल्याण नलावडे, किशोर नलावडे, राष्ट्रवादीकडून विलास चव्हाण, शंकरकाका आधाने निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर विरमगावच्या सरपंच सविता आधाने याही निवडणूक रिंगणार उतरतील अशी चर्चा या गटात सुरू आहे. काँग्रेसकडून माजी सरपंच भीमराव नलावडे, सभापती फरजाना पटेल आदींची नावे चर्चेत आहेत.तालुक्यात सर्वत्र निवडणुकीची चर्चा सुरू असून इच्छुकांनी जनसंपर्क सुरू केला आहे.वेरूळ जि.प. गट हा सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने महिला काँग्रेसच्या प्रदेश चिटणीस शोभाताई जगन्नाथ खोसरे याही या गटातून इच्छुक आहे. त्याच बरोबर राष्ट्रवादीकडून कौशल्याबाई भीमराव खंडागळे, शिवसेनेकडून भारती सुनील औटे पाटील या इच्छूक असल्याने या ठिकाणी पतीऐवजी पत्नी उमेदवार राहतील एवढाच फरक या गटात दिसेल.ं त्यामुळे मोठी चर्चा गावपातळीवर सुरू आहे. आगामी काळात पक्षपातळीवर काय निर्णय होतात यावर बरेच काही चित्र अवंलबून आहे.
निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी
By admin | Updated: October 10, 2016 01:08 IST