औरंगाबाद : मे अखेरीस मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट गडद झाले आहे. मोठ्या, मध्यम, लहान जलप्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे. तर ८५० च्या आसपास टॅँकरने विभागातील ६५० गावांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. १५ लाख लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंंबून आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक भीषण पाणीटंचाई औरंगाबाद जिल्ह्यात असून, जिल्ह्यातील सुमारे १० लाख नागरिकांना ६०० च्या आसपास टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०१५ नंतर यावर्षीचा उन्हाळा ग्रामीण औरंगाबादला गांजतो आहे. जालना जिल्ह्यातील सुमारे २ लाख तर परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांत सर्व मिळून ३ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांत १७ टक्के पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. एकूण सर्व मिळून ८६७ प्रकल्पांत १५ टक्के पाणीसाठा आहे. उन्हाचा पारा चढल्यामुळे जलप्रकल्पांतील पाण्याचे बाष्पीभवनदेखील होत आहे. त्यामुळे विभागात टँकरच्या पाणीपुरवठ्यावर ग्रामीण भाग अवलंबून आहे. यंदा पाऊस लांबल्यास ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना अधिक भटकंती करावी लागेल.
औरंगाबाद सर्वाधिक तहानलेलेऔरंगाबाद जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. औरंगाबाद शहरालगतच्या ६० गावांत १०० च्या आसपास टँकर सुरू आहेत. फुलंब्री तालुक्यात १००, पैठण ५०, गंगापूर १२०, वैजापूर ८२, खुलताबाद २३, कन्नड ३०, सिल्लोड, सोयगावमध्ये १०० टँकरने पाणीपुरवठा आहे. औरंगाबाद शहरालगतच्या दीड लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा होत असून, एमआयडीसीच्या जलकुंभांवरून ते पाणी घेतले जात आहे. पूर्ण जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असून, जिल्हा प्रशासनाला जूनअखेरपर्यंत तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
एमआयडीसीवर भार शहर व लगतच्या गावांना टँकरने पिण्याचे पाणी दिले जात असून, ते पाणी एमआयडीसीच्या चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज ईएसआर, पैठण येथील जलकुंभांवरून दिले जात आहे. परिणामी औद्योगिक वसाहतींमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. एमआयडीसीवर ६ एमएलडी पाणीपुरवठ्याचा भार पडल्यामुळे पाणीपुरवठा विभागाला कसरत करावी लागते आहे.
विभागातील प्रकल्पांची स्थिती :प्रकल्प संख्या पाण्याची टक्केवारीमोठे प्रकल्प ११ १७ टक्केमध्यम प्रकल्प ७५ १४ टक्केलघु प्रकल्प ७४६ ७ टक्केगोदावरी बंधारे ११ १८ टक्केइतर बंधारे २४ १२ टक्केएकूण ८६७ १५ टक्के