बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वर्ष २०१६-१७ मध्ये मंजूर कामे एक जूनपर्यंत प्राधान्याने पूर्ण कराण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले होते. मात्र, काही शासकीय विभागांच्या उदासीन भूमिकेमुळे पावसाळा सुरू झालेला असतानाही तब्बल १०११ कामे अपूर्ण आहेत. विभागीय वन अधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागांतर्गत जलयुक्तची सर्वाधिक कामे अपूर्ण असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील १८६ गावांमध्ये विविध विभागांतर्गत चार हजार ६८० कामे मंजूर करण्यात आली आहेत. जलयुक्तच्या कामांमध्ये पावसाचे पाणी अडल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, या उद्देशाने मंजूर सर्व कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिले होते. यासाठी वारंवार आढावा बैठकाही घेण्यात आल्या. मात्र, अनेक विभागांच्या उदासीन धोरणामुळे पावसाळा सुरू झाला तरी बहुतांश कामे अपूर्ण आहेत. घनसावंगी व अंबड तालुक्यात अपूर्ण कामांची संख्या ३७४ एवढी आहे. बदनापूर, जालना व जाफराबाद तालुक्यातील अनुक्रमे १७८, १३३ व ११२ कामे अपूर्ण आहेत. तर भोकरदन, परतूर, मंठा तालुका मिळून अपूर्ण कामांची संख्या २१४ एवढी आहे. राज्यशासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला काही विभागांच्या उदासीन भूमिकेमुळे हारताळ फासला जात आहे.
जलयुक्तची एक हजार कामे अपूर्ण
By admin | Updated: June 10, 2017 00:10 IST