औरंगाबाद : दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्यांनी आपला मोर्चा आता ज्येष्ठ नागरिकांकडे वळविला आहे. या टोळीने दोन ज्येष्ठांकडून सेवानिवृत्ती वेतनाचे २० हजार हिसकावून पोबारा केला. वृद्धांना लुटण्याची गेल्या दोन महिन्यांतील ही आठवी घटना आहे. वसंत मुरलीधर खणके (८२) हे सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक सिडको एन-८ भागातील गुरुकृपा हौसिंग सोसायटीत वास्तव्यास आहेत. पैशांची गरज असल्याने त्यांनी शनिवारी दुपारी अडीच वाजता सिडकोतील एका बँकेतून १२ हजार रुपये काढले. ही रक्कम त्यांनी कापडी पिशवीत ठेवली. घरापासून जवळ असलेल्या सद्गुरूकृपा सोसायटीच्या कमानीजवळ लालरंगाच्या पल्सरवर अचानक दोन चोरटे आले. खणके यांच्याकडील पिशवी जबरदस्तीने हिसकावून त्यांनी पळ काढला. पिशवीत १२ हजार रुपये आणि पासबुक होते. खणके यांनी मदतीसाठी आरडाओरड केली; परंतु कोणी धावले नाही. त्यामुळे आरोपी सहज पळून गेले. दोन्ही आरोपी २५ ते ३० या वयोगटातील होते. याप्रकरणी सिडको ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दुसरी घटना बन्सीलालनगरात शनिवारी सकाळी अकरा वाजता घडली. पदमपुऱ्याच्या सोनार गल्लीतील रहिवासी राजकुवर शिवराम परदेशी (८१) या सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाने वेदांतनगरच्या स्टेट बँक आॅफ हैदराबादमधून ‘पेन्शन’चे ७,५०० रुपये काढले. रक्कम व पासबुक कापडी पिशवीत ठेवून ते पदमपुऱ्याकडे जात होते. बँकेपासून काही अंतरावर राँगसाईडने दुचाकीवर दोन भामटे आले. ‘कट’ मारण्याचा बहाणा करून त्यांनी परदेशी यांच्याकडील पिशवी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी वेदांतनगर चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असून, फौजदार सिद्दीकी तपास करीत आहेत.
वृद्धांची पेन्शन लुटली
By admin | Updated: May 3, 2016 01:09 IST