छत्रपती संभाजीनगर : रेल्वे स्टेशन रोडवरील जुन्या वेदांत हॉटेलची मंगळवारी सातव्यांदा झालेली लिलाव प्रक्रिया पार पडली. यामध्ये हॉटेलसाठी सर्वोच्च बोली मेसर्स ‘सिद्धांत’ मटेरियल प्रोक्युअरमेंट ॲण्ड सप्लाय कंपनीने ४७ कोटी ५६ हजार ७४९ रुपयांमध्ये लावली. लॉनसाठी १७ कोटी ८२ लाख ६६ हजार रुपयांची बोली ‘सिद्धांत’ कंपनीने लावली. एकूण ६४ कोटी ८२ लाख हॉटेल सिद्धांत यांची झाली.
न्यायालयाच्या आदेशानुसार व एम.पी.आय.डी.ॲक्ट-१९९९च्या तरतुदीनुसार धनदा कॉर्पोरेशनच्या प्रवर्तकाची रेल्वे स्टेशन रोडवरील (जुनी वेदांत) मालमत्ता जप्त करण्यात आली. हॉटेल, भूखंड या मालमत्तेची शासकीय ई-लिलाव प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. सहा वेळा ई-लिलावाची प्रक्रिया राबविण्यात आली. प्रतिसाद मिळाला नाही. लिलावासाठी मालमत्तेची आधारभूत किंमत ६४ कोटी ४५ लाख रुपये ठेवण्यात आली. यात लॉन्ससाठी १७ कोटी ६७ लाख रुपये आधारभूत किंमत ठेवण्यात आली होती. लिलावात त्यासाठी १७ कोटी ८२ लाख ६६ हजार रुपये अशी सर्वाधिक बोली लागली. तसेच हॉटेल इमारत व जलतरण तलावासाठी ४७ कोटी ५६ लाख रुपयांची बोली लागली.
या दोन्ही मालमत्तेसाठी सर्वाधिक बोली मेसर्स ‘सिद्धांत’ मटेरियल प्रोक्युअरमेंट ॲण्ड सप्लाय लावल्याचे समोर आले. दरम्यान, संबंधित कंपनीला लिलावात लावलेल्या बोलीची २५ टक्के रक्कम एका महिन्याच्या आत तर उर्वरित रक्कम ९० दिवसांत द्यावी लागेल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी दिली.