दत्ता थोरे ,लातूरयेथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवड शुक्रवार दि. २२ रोजी होत आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांमध्ये शर्यत लागली आहे. बँकेचे सर्वेसर्वा दिलीपराव देशमुख यावेळी जुना चेहरा देणार की नवा मोहरा ? याची उत्सुकता जिल्हा बँकेच्या संचालकांत आहे. पहिल्यांदाच निवडणूक लागलेल्या लातूर डीसीसीत. आ. दिलीपराव देशमुख गटाने १३ जागा बिनविरोध करुन भाजपाची हवा काढून घेतली. सहा जागांसाठी मतदान लागले खरे, मात्र शिरुर अनंतपाळच्या लक्ष्मण बोधले यांनी काँग्रेस उमेदवार व्यंकट बिराजदारांना पाठिंबा दिल्याने तिथे विरोधक शुन्यावर पडले. जळकोटमधून देवपाल देवशेट्टे या भाजपा नेत्यांने शिलातार्इंचा पराभव करीत विजय खेचला असला तरी हा विजय सर्वपक्षीय असल्याचे सांगत काँग्रेसला साथ देत असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे १९ पैकी १८ जागा मिळविलेली काँग्रेस बहुमतात आहे. रमेश कराड हे भाजपाचे एकमेव नाव बँकेच्या संचालकांत आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. फक्त यावेळी रमेश कराड काय ‘हालचाल’ करतात याची रंजकता असेल. इकडे आ. दिलीपराव देशमुख यांनी अद्याप अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठीचे हुकूम घोषित केलेले नाहीत. त्यामुळे संचालकांच्या मनात डाव रंगले आहेत. निरोपाशिवाय चर्चा नको म्हणून बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी उघड इच्छा व्यक्त करणाऱ्यांची नाही. परंतु अनेकांच्या मनातील लाह्या मात्र फुटू लागल्या आहेत.मंगळवारी सर्व संचालकांनी आ. अमित देशमुख यांची भेट घेऊन चहापान केले आहे. यानंतर सर्वांनी माजी चेअरमन आणि यंदाचे प्रबळ दावेदार एस. आर. देशमुख यांच्या घरी चहापान करुन ‘उतारा’ केला. बँकेचे सारथ्य करणारे आ. दिलीपराव देशमुख सभेच्या एक दिवस आधी लातुरात येत असून सभेच्या दिवशी त्यांच्या घरी आधी संचालकांची बैठक आणि मग इच्छुकांना निरोप जाण्याची शक्यता आहे. बँकेच्या संचालक मंडळात ११ पैकी ११ मोहरे जुने आहेत. त्यातील नऊ मागच्या वेळी होते तर दोघे टर्म सोडून आले आहेत. जुन्यापैकी एस. आर. देशमुख आणि विश्वंभर माने, श्रीपती काकडे हे तीन माजी संचालक आहेत. आ. बसवराज पाटील यांच्या आग्रहामुळे काकडे आल्याने अध्यक्षपदासाठी येण्याची शक्यता कमीच. निलंगेकर गटाचे अशोकराव एकटेच. अशोक गोविंदपूरकरांच्या पराभवानंतर निलंगेकर दोन हात दूर राहण्याचीच शक्यता अधिक. आमदारपदानंतर बाबासाहेब पाटील अध्यक्ष, उपाध्यक्ष होणे मुश्कील. मग जुना मुरब्बी मोहरा असलेले एस. आर. काका, विश्वंभर माने की माजी उपाध्यक्ष नाथसिंह देशमुख हे नवा मोहरा बनणार याची चर्चा आहे. उपाध्यक्ष पदासाठीही एन. आर. पाटील, पृथ्वीराज सिरसाट, भगवान पाटील विजयनगरकर यांच्यात चुरस असेल.
जिल्हा बँकेत जुना मोहरा की नवा चेहरा ?
By admin | Updated: May 20, 2015 00:19 IST