छत्रपती संभाजीनगर : नगरनाका येथे ग्रीन सिग्नल लागल्यानंतर निघालेल्या वाहनाला जालना रोडवर प्रत्येक सिग्नल ग्रीनच मिळेल. केंब्रीज चौकापर्यंत संबंधित वाहनधारकाला कुठेही सिग्नलवर थांबण्याची वेळ येणार नाही, अशा पद्धतीने सिग्नलचे टायमिंग सेट करण्यात येणार आहेत. या पद्धतीमुळे वाहनस्वारांचा वेळ वाचेल व सिग्नलवर थांबलेल्या वाहनांमुळे प्रदूषणही होणार नाही.
शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सिग्नल उभारण्याची जबाबदारी कायद्याने मनपाकडे सोपविली आहे. महापालिकेने आतापर्यंत शहरात ४२ सिग्नल उभारले आहेत. शहरात वाहनांची सर्वाधिक वर्दळ जालना रोडवर असते. त्यामुळे येथील सिग्नलवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. पोलिस आयुक्तालयातील सीसीटीव्हीच्या कमांड सेंटरवरून या सिग्नलवर लक्ष ठेवता येईल. एकाच बटनवर सर्व सिग्नल चालू-बंद करण्याची सोय करण्यात येणार आहे.
मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या सूचनेनुसार शहरात १४ अत्याधुनिक सिग्नल बसविण्यात आले. राष्ट्रीय शुद्ध हवा योजनेअंतर्गत ९, तर महापालिका निधीतून ५ असे १४ सिग्नल स्मार्ट केले जात आहेत. काही सिग्नलची टेस्टिंग सुरू आहे. लवकरच हे सर्व नवीन सिग्नल सुरू होतील, अशी माहिती विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांनी दिली. वाहनस्वारांना दूरवरून सिग्नल दिसेल. कितीवेळ थांबावे लागेल हे कळेल. नवीन सिग्नलमुळे प्रदूषणही कमी होईल.
जालना रोडवर १३ सिग्नलजालना रोडवर एकूण १३ सिग्नल आहेत. नगरनाका, महावीर चौक, जिल्हा न्यायालय, क्रांतीचौक, अमरप्रित, मोंढानाका, आकाशवाणी, सेव्हन हिल, खंडपीठ, वसंतराव नाईक चौक, मुकुंदवाडी, धूत हॉस्पिटल, केंब्रीज चौक.