गंगासमला : माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील जय महेश साखर कारखान्याच्या प्रशासन आणि कामगारातील धुसफुसीचे पर्यावसन मारहाणीत झाले. गुरुवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांत चक्क हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. मागील वर्षी दुष्काळी परस्थितीमुळे उसाचे गाळप कमी प्रमाणात झाल्याने कारखाना प्रशासनाने ४१८ कामगारांना काम करूनही ४६ दिवसाचा लिव्ह आॅफ दिला होता. तसेच दरवर्षी होणारी २०७८ रुपयाची पगारवाढही देण्यात आली नव्हती. यासाठी तेथील जय दुर्गा कामगार संघाने उपोषणही केले होते. शेवटी युनियन आणि कारखाना प्रशासनात तडजोड होऊन कामगारांनी पगारवाढ आणि ४६ दिवसाचा लिव्ह आॅफ यावर मान्यता दिली होती.कामगार युनियनचे काही पदाधिकारी, कामगार उपाध्यक्ष एस. राधाकृष्ण यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या कॅबीनमध्ये गेले होते. चर्चा करताना शाब्दिक चकमक होऊन त्याचे पर्यवसान थेट मारहाणीत झाले. यावेळी कामगारांनी उपाध्यक्ष एस. राधाकृष्ण यांना हेल्मेट, लाथा, बुक्यांनी मारहाण केली. त्यांचे सुरक्षारक्षक व कर्मचाऱ्यांनी कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कामगार युनियनचे सचिव उद्धव बोचरे यांना पोटात मुक्का मार लागला.उपाध्यक्ष एस. राधाकृष्ण यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आम्ही हक्काच्या मागण्या करीत असून प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मागील वर्षी पगारवाढ न करता अधिकाऱ्यांना मात्र वाढ दिली. यावर्षी होत असलेल्या अन्यायाविरुद्ध विचारले असता अरेरावीची भाषा करून मारहाण करण्यास सुरूवात केल्याचे जय दुर्गा कामगार संघ पवारवाडीचे अध्यक्ष सुनील शेजूळ यांनी सांगितले. (वार्ताहर)
अधिकारी-कर्मचाऱ्यांत हाणामारी !
By admin | Updated: March 10, 2017 00:17 IST