औरंगाबाद : जगविख्यात औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था आणि धोकादायक अवस्था पाहून प्रवासी आणि पर्यटकांच्या अंगावर काटा येतो. कधी अद्ययावत बसस्थानक , तर कधी बसपोर्ट बांधण्याचे ‘गाजर’ वर्षानुवर्षे महामंडळाकडून दाखविण्यात येत आहे. एकीकडे बसस्थानक बकाल झालेले असताना दुसरीकडे विभाग नियंत्रक कार्यालयाला कॉर्पोरेट लूक दिले जात आहे. त्यामुळे महामंडळाचे प्राधान्यक्रम प्रवासी सुविधांना आहे की, कार्यालयीन सुविधांना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पर्यटनाची आणि मराठवाड्याची राजधानी म्हणून औरंगाबादची ओळख आहे. राज्यातील विविध भागांतून व परराज्यांतून दररोज हजारो प्रवासी शहरातून ये-जा करतात. मध्यवर्ती बसस्थानकातून दिवसभरात सातशेहून अधिक बसेस ये-जा करतात. मध्यवर्ती बसस्थानक बांधून ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. एसटी महामंडळाला कोट्यवधींचे उत्पन्न देणाऱ्या या बसस्थानकाच्या इमारतीची गेल्या काही वर्षांत दुरवस्था झाली आहे.
एकीकडे बसस्थानकाची ही अवस्था आहे, तर दुसरीकडे विभाग नियंत्रक कार्यालयास कॉर्पोरेट लूक देण्यात येत आहे. कार्यालयात प्रवेश करताच एसटी महामंडळाच्या कार्यालयात आलो आहोत की एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयात आलो, असा प्रश्न अभ्यागताना पडतो. तीन ते चार महिन्यांतच कार्यालयाचे रूप बदलून गेले आहे.
फक्त राजकीय घोषणाकाही वर्षांपूर्वी महामंडळाने बसस्थानकाची बीओटी तत्त्वावर विकास करण्याची तयारी केली; परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे बीओटीवर विकास करणे टाळण्यात आले. परिवहनमंत्र्यांनी २०१६ मध्ये मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेवर बसपोर्ट उभारण्याची घोषणा केली; परंतु दोन वर्षांनंतरही बसपोर्ट कागदावरच राहिले. शहरासाठी ही फक्त राजकीय घोषणाच ठरल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. निविदेला प्रतिसाद मिळाला नसल्याने थेट बसस्थानकाची योजनाच मागे टाकण्यात आली आहे. आता सिडको बसस्थानकावर बसपोर्ट बांधण्याची तयारी महामंडळाने केली आहे, तर मध्यवर्ती बसस्थानकाचे नूतनीकरण केले जाणार असल्याचे अधिकारी सांगून मोकळे झाले आहेत.
विभाग नियंत्रक कार्यालयाची स्थितीविभाग नियंत्रक कार्यालयात पार्किंग व्यवस्था, उद्यान, कार्यालयाच्या आतमध्ये रंगकाम, आकर्षक दरवाजे, अभ्यागताना बसण्याची सुविधा, चकाचक फरशा, पिण्याच्या पाण्याची सुविधा लक्ष वेधून घेतात. यापुढे जाऊन आता कर्मचाºयांचे टेबलही कॉर्पोरेट कार्यालयांप्रमाणे दिले जाणार आहे. इमारतीच्या बाहेरही लवकरच रंगकाम होणार आहे. या सगळ्यांवर मोठा खर्च केला गेला; परंतु हा खर्च काही हजारांत असल्याचे सांगून अधिकारी अधिक बोलणे टाळत आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकाची अवस्थामध्यवर्ती स्थानकाच्या छताचे प्लास्टर ठिकठिकाणी उखडल्याचे दिसते. काही ठिकाणी लोखंडाला गजही दिसतो. छताचे प्लास्टर प्रवाशांच्या अंगावर पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकाची धोकादायक अवस्था समोर आली. पार्किंग व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला आहे. जिकडे नजर जाईल तिकडे अस्वच्छता दिसून येते. पिण्याच्या पाण्याच्या जागेतील अस्वच्छतेमुळे मिनरल वॉटरच्या बाटल्या खरेदी करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. प्रवासी सुविधांकडे दुर्लक्ष करून प्रवाशांची बोळवण केली जात आहे.
लवकरच नूतनीकरणमध्यवर्ती बसस्थानकाचे लवकरच नूतनीकरण केले जाणार आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरूआहे. यासंदर्भात मुंबई कार्यालयास कळविण्यात आलेले आहे.-प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ