तयारी परीक्षेची : केंद्रप्रमुखांना परीक्षेच्यावेळी काळजी घेण्याच्या मंडळाच्या सूचना
---
औरंगाबाद : दरवर्षी पाच जिल्ह्यांच्या विभागात जेवढी परीक्षा केंद्रे असतात, त्यापेक्षा अधिक ठिकाणी यावर्षी एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात परीक्षा होणार आहे. यात बोर्डासह शिक्षण विभागाचा कस लागणार आहे.
अनेक शाळा, महाविद्यालयांत दहावी, बारावीचे प्रवेशित विद्यार्थी आहेत. मात्र, त्या शाळांत बसण्याची व्यवस्था व इतर सुविधा योग्य नसल्याने अशा शाळांनी बोर्डाच्या परीक्षा घेण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे. अशा शाळा, महाविद्यालयांच्या एकत्रिकरणाचे काम सध्या सुरू आहे. बोर्डाचे केंद्र त्याअंतर्गत उपकेंद्र परीक्षांचे नियोजन सांभाळतील. त्या उपकेंद्राचे प्रमुख, तालुकास्तरावर परिरक्षक आदींचे नियोजन शिक्षण विभाग करतोय. याशिवाय प्रश्नसंच, उत्तरपत्रिका वितरण व संकलनाचे नियोजन सध्या सुरू आहे. अशी माहिती विभागीय परीक्षा मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी दिली.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. बारावीच्या परीक्षांना २३ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेवर कोरोनाचे सावट असल्याने, विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बोर्डाकडून तयारी सुरू आहे. परीक्षेसंदर्भातील नियोजनाच्या राज्य मंडळाच्यावतीने देण्यात आलेल्या सूचना केंद्रप्रमुखांना लेखी स्वरूपात पाठविण्यात आल्या आहेत. कोराेनामुळे प्रत्यक्ष बैठक घेऊन सूचना देणे शक्य नसल्याने ऑनलाईन बैठक घेऊन माहिती देण्यात येणार असल्याचे पुन्ने म्हणाल्या.
राज्य मंडळाच्या सूचनांनुसार सर्व तयारी झाली आहे. नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा होईल. एका बाकावर एक, तर नागमोडी वळणाने बैठक व्यवस्था असेल, असेही त्यांनी सांगितले.
--
ग्रामीणमध्ये ५०, तर शहरात १०० विद्यार्थ्यांचे उपकेंद्र
--
कुठे ३३, तर कुठे २ ते ३ प्रवेश, तर कुठे प्रवेशाएवढी बैठक व्यवस्था नाही. कमी विद्यार्थी असल्याने प्रत्येक ठिकाणी परीक्षा घेणे बोर्डाला परवडणारे नाही. तसेच शक्यही होणार नाही. त्यामुळे १४ एप्रिलपूर्वी ग्रामीणमध्ये ५०, तर शहरात १०० विद्यार्थी तिथे उपकेंद्र नियोजनाची प्रक्रिया सुरू आहे. केंद्राकडून उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका पुरवठा व संकलन केले जाईल, असे पुन्ने म्हणाल्या.
---
दहावीची ६६२, तर बारावीची ५७२ केंद्रे
---
दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यासाठी जिल्ह्यात केंद्रांसह उपकेंद्रांची निश्चिती प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरू आहे. विद्यार्थी ज्या शाळेत, महाविद्यालयात शिकतात, तिथेच परीक्षा देता येणार असल्याने विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे. याविषयी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी चव्हाण म्हणाले, अद्याप अंतिम केंद्रनिश्चिती झाली नसली तरी, संभाव्य ६६२ शाळांत दहावीची, तर ५७२ शाळा, महाविद्यालयांत बारावीची परीक्षा घेण्यासंबंधी नियोजन सुरू आहे.
---
६५,०११
दहावीचे विद्यार्थी
--
५५,१७७
बारावीचे विद्यार्थी