औरंगाबाद : कारणे दाखवा नोटिसीपाठोपाठ महानगरपालिकेने आता औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीचा देखभाल अनुदानाचा त्रैमासिक हप्ताही थांबविला आहे. कंपनीचे १६ कोटी ५० लाख रुपयांचे बिल न काढण्याचे आदेश आयुक्तांनी लेखा विभागाला दिले आहेत. त्यामुळे युटिलिटी कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाकडून समांतर जलवाहिनी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम सार्वजनिक खाजगी तत्त्वावर (पीपीपी) केले जात असून, त्यासाठी मनपाने औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीसोबत करार केलेला आहे; परंतु वर्ष उलटले तरी कंपनीकडून योजनेतील कामे कासवगतीने सुरू आहेत. त्यामुळे पालिका आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तीन दिवसांपूर्वीच कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटिसीबरोबरच आता मनपाने कंपनीला दिल्या जाणाऱ्या त्रैमासिक अनुदानाचा हप्ताही थांबविला आहे. मनपाकडून कंपनीला वार्षिक देखभाल अनुदान दिले जाते. पाणीपुरवठा योजनेचे कार्यान्वयन आणि वीज बिल यासाठी म्हणून हे अनुदान दिले जाते, दर तीन महिन्यांनी मनपा १६ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम कंपनीला देते; परंतु आता मनपाने चालू महिन्यात द्यावयाचा हा हप्ता थांबविला आहे. पुढील आदेशापर्यंत ही रक्कम देऊ नये, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
आता समांतरचे अनुदानही थांबविले
By admin | Updated: December 16, 2015 00:13 IST