जालना : यंदा झालेला चांगला पाऊस आणि राज्य सरकारकडून स्टील इण्डस्ट्रीला वीजबिल दरात दिलेली १ रुपया १७ पैशांची सूट यामुळे या उद्योगाला चांगले दिवस आलेत. आगामी काळात गृहप्रकल्प आणि रस्त्यांची कामे सुरु होणार असल्याने खऱ्या अर्थाने स्टील उद्योगाला ‘अच्छे दिन’ येणार आहेत, अशी भावना स्टील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष घनशामदास गोयल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.स्टील उद्योगाच्या माध्यमातून जालना शहराचे नाव देशाच्या नकाशावर गेले आहे. जालना औद्योगिक वसाहतीत तयार होणारे स्टील देशाच्या विविध भागांतील मोठ-मोठ्या प्रकल्पांसाठी वापरण्यात येत आहे. सळईची गुणवत्ता आणि दर्जा राखण्यात येत असल्याने अनेक बॅ्रण्डस् उदयास आले आहेत. गत काही दिवसांत स्टील उद्योग मोडकळीस आला होता. तसेच मंदीच्या फेऱ्यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या. यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र आशादायी चित्र आहे. उद्योगपती गोयल यांनी स्टील उद्योगातील सद्यस्थितीबाबत मनमोकळी चर्चा केली. गोयल म्हणाले, गत काही दिवसांत स्टील उद्योगाचा व्यवसाय १० टक्क्यांनी वाढला आहे. तसेच दरही ५ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. तर गत दोन महिन्यांपासून वीजबील दरात सूट दिली जात असल्याने याचाही लाभ अनेक कंपन्यांना झालेला आहे. दिलासादायक वातावरण असल्याने अनेक बंद कंपन्या पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर असून, बँकाही सकारात्मक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच गत तीन ते चार वर्षांत अडचणीत सापडलेला हा उद्योग आता कात टाकत असून, व्यवसायांच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. आगामी दिवाळी व इतर सणांनिमित्त गृहप्रकल्प, रस्ते व इतर प्रकल्प हाती घेतले जात असल्याने स्टीलला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढणार असल्याने स्टील उद्योगाचे गतवैभव पूर्ववत प्राप्त होेईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. त्यातच वीजबील दरात सूट दिली जात असल्याने इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर आता उद्योगांना परवडणारे आहेत. त्यामुळे आगामी काळात या क्षेत्रात गुंतवणूक वाढण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखविली. (जिल्हा प्रतिनिधी)
आता स्टील उद्योगाला ‘अच्छे दिन’
By admin | Updated: October 1, 2016 01:08 IST