जालना : गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघात सर्वच उमेदवारांनी रात्रीचा दिवस करून केलेल्या प्रचाराचा कालावधी संपला. परंतु मतदानाच्या आदल्या दिवशीची रात्र वैऱ्याचीच असल्याने सर्व उमेदवार व त्यांचे समर्थक ही रात्र जागूनच काढणार, असे चित्र आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांवर पोलिस यंत्रणाही बारीक लक्ष ठेवून आहे. गेल्या ३० वर्षांच्या काळात जिल्ह्यात प्रथमच विधानसभेची निवडणूक पाचही मतदारसंघांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होईल, अशी चिन्हे आहेत. जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून नशीब आजमावित आहेत. त्यामुळे सर्वजण प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर मतदान प्रक्रिया पूर्णपणे पार पडेपर्यंत करडी नजर असणार आहे. दररोज प्रचार, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक, व्यवस्था इत्यादींमुळे उमेदवारांना चार तासांचीच झोप मिळाली. सोमवारी प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना थोडीफार उसंत मिळाली असली तरी कार्यकर्त्यांच्या गराड्यातून ते सुटले नाहीत. मतदानाच्या दिवशी अधिक दक्ष राहण्याच्या सूचना उमेदवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या. त्यासाठी प्रत्येक उमेदवारांनी कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट करून त्यांच्यावर निवडणुकीसाठीची जबाबदारी सोपविली. १५ आॅक्टोबर रोजी मतदान असल्याने १४ तारखेची रात्रही जागून काढली जाणार आहे. (प्रतिनिधी)
आता उमेदवारांसाठी रात्र वैऱ्याचीच...!
By admin | Updated: October 14, 2014 00:32 IST