जालना : सर्व रेशनकार्ड कार्ड धारकांचे रेशनकार्ड आता आधारकार्डशी लिंक करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र या कामास जिल्ह्यात रेशन विक्रेत्यांकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने पाच तालुक्यातील २०५ विक्रेत्यांना जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी नोटिसा बजावल्या आहेत.आगामी काळात बारकोड पद्धतीचे रेशनकार्ड मिळणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात लिंकिंगची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे १२०० रेशन विक्रेते आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी या सर्व रेशन विक्रेत्यांना कार्डधारकांशी संपर्क करून त्यांच्याकडून महिला कुटुंब प्रमुखाचे छायाचित्र, त्यांचा राष्ट्रीयकृत बँकेतील खातेक्रमांक आणि आधार कार्डचा क्रमांक घेण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी दिले होते. मात्र बहुतांश दुकानदारांकडून या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे अशा दुकानदारांचा शोध जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात आला. त्यात आतापर्यंत २०५ विक्रेत्यांकडून निष्काळजीपणा झाल्याचे लक्षात आल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.दरम्यान, आधार कार्ड लिंक न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारकडून मिळणारे शंभर रूपयांचे अनुदान तसेच पडून आहे. येत्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांनी त्यांच्या हद्दीत येणाऱ्या ग्राहकांशी संपर्क करून त्यांच्याकडून विहित नमुन्यातील अर्ज भरून घेण्याचे आवाहन माचेवाड यांनी केले आहे. या कामात दिरंगाई करणाऱ्या रेशन दुकानदारांचा परवाना निलंबित करण्याची कारवाई देखील होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. या योजनेस नागरिकांनीही सहकार्य करावे, असेही आवाहन माचेवाड यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात २०५ रेशन दुकानदारांना नोटिसा
By admin | Updated: May 18, 2015 00:18 IST