बाबूराव चव्हाण , उस्मानाबादअचानक लागलेली आग तातडीने आटोक्यात आणता यावी, यासाठी शासनाने २००८-२००९ मध्ये जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळांना अग्निरोधक पुरविली होती. एक वर्षानंतर त्याचे रिफीलिंग करणे आवश्यक होते. परंतु, ना शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने ना मुख्याध्यापकांनी ही लक्षात घेतली. यासंदर्भात २१ जुलै रोजी ‘लोकमत’ ६० टक्के अग्निरोधक कालबाह्य, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील आठही गटशिक्षण अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. अग्निरोधकांच्या रिफिलींगचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.तुळजापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पोषण आहार शिजविताना अचानक सिलिंडरला जोडलेल्या पाईपला आग लागली. शाळेमध्ये असलेले अग्निरोधक कार्यान्वित होऊ शकले नाही. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी शाळेपासून जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरून अग्निरोधक आणून आग विझविली. कर्मचाऱ्यांच्या या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. अशा स्वरूपाच्या अचानक घडणाऱ्या घटनांचा धोका लक्षात घेऊनच शासनाने २००८-२००९ या वर्षामध्ये जिल्हाभरातील जिल्हा परिषद आणि नगर परिषद मिळून अकराशेवर शाळांना अग्निरोधक दिली होती. एक वर्षानंतर अग्निरोधकाचे रिफिलींग करणे आवश्यक होते. परंतु, बहुतांश मुख्याध्यापक वा अधिकाऱ्यांनी त्यावर फारसे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे आजघडीला सुमारे ६० टक्क्यांवर अग्निरोधके कालबाह्य झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते.दरम्यान, अग्निरोधक हे शाळेच्या दर्शनी भागात ठेवण्याबाबत सूचना असतानाही काही शाळांमध्ये ते अडगळीला पडले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते कसे हाताळायचे याची कर्मचाऱ्यांना कल्पना नाही. हा सर्व प्रकार ‘लोकमत’ने २१ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना जाग आली आहे. प्रभारी शिक्षणाधिकारी ए. एस. उकिरडे यांनी मंगळवारी जिल्हाभरातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना (बीईओ) कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. अग्निरोधकांच्या स्थितीबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रिफिलींगबाबत वर्षभरापूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही जणांनी रिफिलींग करून घेतले आहे. मात्र, त्याचा अहवाल शिक्षण विभागाला सादर केला नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून गटशिक्षण अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत.- ए. एस. उकिरडे, शिक्षणाधिकारी.
आठ ‘बीईओं’ना नोटिसा
By admin | Updated: July 24, 2014 00:12 IST