परभणी : इंटक संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या मागणीसाठी पुकारलेला संप शुक्रवारी सायंकाळी मिटला. यामुळे शुक्रवारी सकाळपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत परभणी विभागातील सर्व बसेस आगारातच उभ्या होत्या. परिणामी संपाच्या दुसऱ्या दिवशी प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. इंटक संघटनेच्या वतीने १७ डिसेंबर रोजी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला. या संपात चालक, वाहक, अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. गुरुवारी सायंकाळपर्यंत इंटकच्या पदाधिकाऱ्यांची परिवहन विभागाच्या अधिकारी व मंत्र्यांशी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत चर्चा सुरु होती. रात्री संप मिटेल, अशी अपेक्षा होती. परंतु, गुरूवारी ही बोलणी अर्धवट राहिली. त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी पुन्हा राज्यभर संप सुरु ठेवण्यात आला. परभणी विभागातील ३८ फेऱ्या गुरुवारी बाहेर पडल्या होत्या. मात्र शुक्रवारी संपूर्ण परभणी विभागातून एकही बस कोणत्याच आगारातून बाहेर गेली नाही. परभणी, कळमनुरी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, वसमत, हिंगोली या सर्व आगारातील बसेस आगारातच होत्या. सर्व कर्मचारी, चालक, वाहक यांनी आपापल्या आगार परिसरात संघटनेच्या संपामध्ये सहभाग नोंदविला. दररोज परभणी विभागांतर्गत २ हजार ३५१ फेऱ्या होतात. या फेऱ्याच्या माध्यमातून महामंडळाला ३५ ते ४० लाखांचे उत्पन्न मिळते. दुसऱ्या दिवशीही सुरु असलेल्या संपाने लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.
प्रवाशांची गैरसोयच
By admin | Updated: December 18, 2015 23:31 IST