छत्रपती संभाजीनगर : तृतीयपंथी समोर दिसला की अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात... जिल्ह्यात ८ ते १० हजार तृतीयपंथी आहेत; पण केवळ १३२ जणांकडेच मतदार कार्ड आहे. कोणताही राजकीय पक्षाचा उमेदवार असो आमच्याकडे कोणी मत मागायला येत नाही. आम्ही मतदानाला जातो व ‘नोटा’चे बटण दाबून संविधानाने दिलेल्या अधिकाराचा हक्क बजावतो, असे मत तृतीयपंथी सँडी गुरू यांनी व्यक्त केले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजातील एक वर्ग तृतीयपंथीयांचे काय मत आहे, याविषयी सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या संचालिका, सॅण्डी गुरूशी संवाद साधला असता त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्षे झाली; पण अजूनही तृतीयपंथी समाज पारतंत्र्यातच जगत आहे, असा खेद व्यक्त करीत सॅण्डी गुरूंनी सांगितले की, आतापर्यंत निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात तृतीयपंथीयांचा विचार केला गेला नाही.
तृतीयपंथीयांमध्ये जनजागृती नसल्याने मतदार कार्ड काढून घेण्यात मोठी उदासीनता आहे. मतदानात टक्केवारी वाढत नसल्याने राजकीय पक्षही तृतीयपंथीयांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
खरे धर्मनिरपेक्ष आम्हीचधर्मनिरपेक्ष तर तृतीयपंथीयच आहेत, असे सॅण्डी गुरूंनी अभिमानाने सांगितले, देशात कोणी धर्मनिरपेक्ष, जातीभेद न मानणारा असेल तर फक्त तृतीयपंथीयच आहे. आम्ही कोणाला धर्म विचारत नाही, जात विचारत नाही की पंथ... तरी आम्ही सर्व तृतीयपंथीय गुण्यागोविंदाने नांदतो... जो आम्हाला भीक देईल, तोच आमच्यासाठी परमेश्वर असतो.
२००५ पासून मतदानसॅण्डी गुरूंनी सांगितले की, २००५ मध्ये महापालिकेची निवडणूक झाली तेव्हापासून मतदान करीत आहे. पूर्वी आजोबा ज्या राजकीय पक्षाला मतदान करीत, त्याच पक्षाला मी मतदान करीत असे; पण नंतर योग्य उमेदवार वाटत नसल्याने मी ‘नोटा’लाच मतदान करीत असते.
कोणाला मतदान करावे ?सॅंडी गुरूंनी सांगितले की, खासदार जनतेचा सेवक असतो, तो राजा नसतो. स्वत:ला राजा समजणाऱ्याला मतदान करू नका. तळागाळातील लोकांपर्यंत ज्यांचा संपर्क आहे, जो सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होऊ शकतो, जो जातिभेद, वर्णभेद, लिंगभेद मानत नाही, अशा उमेदवाराला मतदान करावे. मतदान करताना डोळे उघडे ठेवून बटण दाबावे, असे आवाहन सॅण्डी गुरूंनी केले.