छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. अद्याप मंत्रिमंडळ बैठक घेण्याबाबत शासनाकडून काहीही निरोप, माहिती, सूचना मिळालेली नाही. त्यामुळे यावर्षी मंत्रिमंडळ बैठक होईल की नाही, याबाबत साशंकता आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त २०२३ साली १६ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक स्मार्ट सिटी कार्यालयात पार पडली होती. २०२४ साली मात्र बैठक झाली नाही. २०२३ साली ४५ हजार कोटींचे पॅकेज तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. त्यातील किती विभागांची कामे झाली आहेत, याची माहिती विभागीय प्रशासनाने संकलित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच २०२४ साली जाहीर केलेल्या १५०० कोटींच्या पॅकेजमधील कामांचे काय झाले, याचीही माहिती प्रशासन घेणार आहे. २०२३ सालच्या ४५ हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणांमध्ये ३५ हून अधिक विभागांसह सिंचनासाठी १४ हजार कोटींची स्वतंत्र घोषणा केली होती.
१७ वर्षांत ३ बैठका, १ लाख ३१ हजार कोटींच्या घोषणामागील १७ वर्षांत मराठवाड्यात तीन मंत्रिमंडळ बैठका झाल्या. २००८ साली दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. अंदाजे २१ हजार कोटींचे पॅकेज त्यावेळी दिले होते. २०१६ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ५० हजार कोटींचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला होता. त्यातून फारशी उपलब्धी झाली नाही. १६ सप्टेंबर २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४५ हजार कोटींसह १४ हजार कोटींच्या पश्चिमी वाहिन्यांचे पाणी वळविण्यासाठी ५९ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. २०२४ साली १५०० कोटींचे पॅकेज शिंदे यांनी जाहीर केले होते. १७ वर्षांत सुमारे १ लाख ३१ हजार कोटींच्या पॅकेजच्या घोषणा झाल्या.
अद्याप काहीही निरोप नाहीमराठवाड्यासाठी मंत्रिमंडळ बैठक घेण्याबाबत अद्याप शासनाकडून काहीही निरोप नाही. त्यामुळे बैठक होणार की नाही, याबाबत काहीही ठोस माहिती सांगता येणार नाही. परंतु घाईगडबडीत बैठक होईल, असे सध्या तरी वाटत नाही. मागील २ वर्षातील पॅकेजचा आढावा घेण्यात येईल.-जितेंद्र पापळकर, विभागीय आयुक्त