लक्ष्मण दुधाटे , पालमपालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातून नांदेड शहरासाठी २४ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती. चार दरवाजे उघडून दुपारी १.०० वाजेपर्यंत चोख पोलिस बंदोबस्तात ९ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. पाणी सोडताना वाद होऊ नयेत, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने डिग्रस परिसराला छावणीचे स्वरुप आले होते. डिग्रस बंधाऱ्यातील पाण्याचा प्रश्न नेहमीच वादात सापडला आहे. दोन महिन्यापूर्वी पाणी सोडताना शासकीय अधिकारी व स्थानिकांचा वाद शिगेला पोहचला होता. यामुळे पाणी सोडण्यात आले नव्हते. मागील आठ दिवसांपासून बंधाऱ्यातील पाणी नांदेडला पळविण्यासाठी हालचाली सुरू होत्या. परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी सोडण्याची प्रक्रिया झपाट्याने पार पडली. स्थानिकांचा होणारा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला होता. २४ जुलै रोजी पहाटेपासून पोलिसांची वाहने डिग्रस परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली होती. बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी नाकेबंदी केल्याने स्थानिकांना विरोध करण्यासाठी संधी मिळाली नाही. सकाळी ९.३० मिनिटांनी बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली. टप्याटप्याने चार दरवाजे उघडून १२.४५ मिनिटांला दरवाजे बंद करण्यात आले आहेत. या कालावधीत बंधाऱ्यातील ९ दलघमी पाण्याचा विसर्ग झालेला आहे. दरवाजे बंद करताना वीज पुरवठा खंडित झाल्याने मनुष्य बळाचा वापर करीत दरवाजे बंद करावे लागले. बंधाऱ्यातील ९ दलघमी पाणी सोडल्याने बंधाऱ्यात आता केवळ १२ दलघमी पाण्याचा साठा राहिल्याने गोदावरीने तळ गाठला आहे. यावेळी पोलिस प्रशासनाचा कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पाणी सोडताना उपविभगीय अधिकारी गोविंद रणवीरकर, अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठक्कर, तहसीलदार डॉ. भवानजी आगे, नायब तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांच्यासह विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच मोठा पोलिस बंदोबस्त होता़ (प्रतिनिधी)खाकी वर्दीचा धाकडिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मागील चार दिवसांपासून गतीमान झाली होती. स्थानिकांचा विरोध मोडून काढण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात होत्या. यापूर्वी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून प्रशासनाने दहशत निर्माण केलेली आहे. त्यामुळे पाणी सोडताना विरोध केल्यास कारवाई होईल, या भितीने अनेक जण चिंतेत होते. २४ जुलै रोजी पाणी सोडताना विरोध होऊ नये यासाठी स्थानिक जनतेला खाकी वर्दीचा धाक दाखविला जात होता. रस्त्यावर जागोजाग नाकेबंदी करून डिग्रसच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्यांची चौकशी केली जात होती. त्यामुळे पाणी सोडण्यासाठीचा विरोध कमी झाला. पात्रात शिल्लक राहिला गाळडिग्रस बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. यामुळे आतापर्यंत काठोकाठ असलेली गोदावरी रिकामी झाली आहे. भरपूर पाणी सोडल्याने गोदावरीच्या पात्रात आता गाळच शिल्लक राहिलेला आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या मोजमापाप्रमाणे १२ दलघमी पाण्याचा साठा शिल्लक राहिला, असे कागदावर असले तरीही या पाण्यात गाळाचे प्रमाण जास्त आहे. गोदावरीच्या पात्रातील मोठमोठे खड्डे गाळाने भरल्याने गोदावरीचे पात्र उथळ झाले आहे. परिणामी पाण्याची साठवण म्हणावी तशी शिल्लक राहत नाही. सध्या नांदेडला पाणी सोडल्यामुळे पात्रात गाळ शिल्लक आहे.
नऊ दलघमी पाणी सोडले
By admin | Updated: July 25, 2014 00:27 IST