औरंगाबाद : महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला असून, दिवाळीनंतर नवीन महापौर-उपमहापौर विराजमान होणार आहेत. मावळत्या पदाधिकाऱ्यांची २९ आॅक्टोबर रोजी अंतिम सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी विद्यमान दोन्ही पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यानंतर महापौर निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.शिवसेना-भाजप यांच्यात पद वाटपाचा करार झाला आहे. यंदा महापौरपद भाजपला देण्यात आले आहे. उपमहापौरपद सेनेला मिळणार आहे. भाजपतर्फे माजी स्थायी समिती सभापती राजू शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्यासोबत माजी उपमहापौर बापू घडामोडेही इच्छुक आहेत. राजगौरव वानखेडे, कमल नरोटे यांनीही आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. महापौरपद खुल्या प्रवर्गात येते. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. यानिमित्ताने भाजपने राजू शिंदे यांना उमेदवारी दिल्यास समाजात चांगला मॅसेज जाईल, असे भाजपला वाटू लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा सोशल इंजिनिअरिंगचा अभ्यास दांडगा आहे. महापौरपद कोणाला दिल्यास पक्षाला फायदा होईल, याची जाणीवही त्यांना आहे. शिवसेनेचे वाढते वर्चस्व थांबविण्यासाठी एकीकडे भाजपने किशनचंद तनवाणी यांना शहराध्यक्षपद दिले. असाच काहींसा प्रयोग पक्षनेते करतील, असा कयास लावण्यात येत आहे. महापौरपदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. संघ परिवाराचाही आशीर्वाद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असताना सेनेत उपमहापौरपद मिळविण्यासाठी अजिबात नगरसेवकांना रस नाही. पक्षश्रेष्ठींना ऐनवेळी ज्येष्ठ नगरसेवकाला हे पद द्यावे लागणार आहे.राजीनामा देणार २९ आॅक्टोबर रोजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. या सभेनंतर तुपे यांच्यासह भाजपचे उपमहापौर प्रमोद राठोडही राजीनामा देतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अलीकडे दोन्ही पदाधिकारी राजीनामा देण्यास इच्छुक नव्हते. सेना-भाजपमधील स्थानिक नेत्यांना युतीधर्म पाळायचा आहे. महापौर-उपमहापौर निवडणूक नियोजित वेळीच घ्यावी, अशी चर्चा उभय नेत्यांमध्ये आहे. महापौर-उपमहापौरांनी राजीनामा दिल्यानंतर मनपा प्रशासन निवडणूक कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्तांची मदत घेईल.२९ आॅक्टोबर रोजी महापौर-उपमहापौरांचा कार्यकाळ संपणार आहे. दिवाळीनिमित्त राजीनामा देण्याची प्रक्रिया एक ते दोन दिवस मागे पुढे होऊ शकते. शिवसेनेसोबत यासंदर्भात आमची बोलणी सुरू आहे.- किशनचंद तनवाणी, शहराध्यक्ष, भाजपमहापौर-उपमहापौर निवडणुकीचा विषय वरिष्ठ पातळीवर झाला आहे. यासंदर्भात स्थानिक पातळीवर कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही. वरिष्ठांच्या आदेशाचे तंतोतंत पालन होईल. किंतु-परंतुचा काहीही संबंध नाही.- अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
दिवाळीनंतर नवीन महापौर-उपमहापौर
By admin | Updated: October 20, 2016 01:47 IST