पालम : तालुक्यातील खडी येथील शेतकर्यांनी कृषी पंपांच्या नवीन जोडणीसाठी कोटेशन भरले आहे़ परंतु, कोटेशन भरून वर्षभराचा कालावधी लोटला तरीही नवीन जोडणी देण्यात आलेली नाही़ यामुळे शेतकर्यांच्या कृषी उत्पादनाला फटका बसत असून, शेतकर्यांनी वीज कंपनीकडे तक्रार केलेली आहे़ पालम तालुक्यातील ग्रामीण भागात कृषीपंपांना वीज जोडणी मिळावी यासाठी शेतकरी वर्गाने कोटेशन भरलेले आहे़ वीज चोरीविरूद्ध कारवाई करणार्या कंपनीला नवीन जोडणी देण्यासाठी वेळ मिळालेला नाही़ वीज कंपनीकडून वेळेत वीजजोडणी न दिल्याने शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ ग्रामीण भागातील ग्राहकांच्या मागणीकडे वीज कंपनीचे अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत़ नवीन वीज जोडणी देणे, नवीन विद्युत लाईन बसविणे, रोहित्र बसविणे, बिघाडांची दुरुस्ती करणे याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे़ विशेषत: वीज कंपनीकडून शेतकर्यांची नेहमीच या ना त्या कारणाने अडवणूक केली जात आहे़ शेतकर्यांना कोणी वाली नसल्याने अधिकारी शेतकर्यांशी हुज्जत घालत आहेत़ खडी येथे कृषीपंपांना जोडणी मिळावी, यासाठी शेतकर्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे़ कागदपत्र व रक्कम भरून कोटेशन घेतले आहे़ परंतु, या शेतकर्यांच्या जोडणीकडे दुर्लक्ष केले जात आहे़ वर्षभरापासून शेतकर्यांच्या कृषीपंपांना जोडणी देण्यासाठी पुरेसा वेळ कर्मचार्यांना मिळेला नाही़ याउलट नवीन जोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकर्यांना मात्र लवकर जोडणी देण्यात आली आहे़ शेतकरी या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पालम येथील कार्यालयात आले होते़ कार्यालयात प्रमुख अधिकारी हजर नसल्याने परत जाण्याची वेळ शेतकर्यांवर येत आहे़ वीज कंपनीच्या प्रमुख अधिकार्यांच्या कक्षाला नेहमीच टाळे दिसत असल्याने तक्रारी करण्यासाठी येणार्या शेतकरी व ग्राहकांना कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत़ (प्रतिनिधी)
नवीन कृषीपंपांना जोडणी मिळेना
By admin | Updated: May 22, 2014 00:32 IST