बीड : येथील पालिकेत सहायक नगर रचनाकार (ट्रेसर) म्हणून कार्यरत असलेल्या सय्यद सलीम यांच्या घरावर निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी दुपारी पावणेचार वाजता मोठी रोकड असल्याच्या संशयावरून छापा मारला. मात्र, तीन तासांच्या झडतीनंतर पथक रिकाम्या हाती परतले. त्यामुळे सय्यद सलीम यांच्या कुटुंबियांना नाहक ‘स्ट्रेस’ सहन करावा लागला.सय्यद सलीम सय्यद याकूब यांचे कारंजा व बार्शी नाका येथे स्वत:च्या मालकीचे घर आहे. दोन्ही घरांमध्ये पथकाने तपासणी केली. कारंजा भागात निवडणूक विभागाचे पथक पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह धडकले. यावेळी सय्यद सलीम हे घरी नव्हते. ते स्वत: परळी नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत कर्तव्यावर होते. सलीम यांच्या कुटुंबियांना तपासणीची माहिती देऊन पथकाने आपली कार्यवाही सुरू केली. तीन मजली इमारतीत चित्रीकरणात कसून तपासणी करण्यात आली. मात्र, पथकाच्या हाती काहीच न लागल्याने त्यांची निराशा झाली. (प्रतिनिधी)
नाहकच ‘स्ट्रेस’!
By admin | Updated: November 19, 2016 00:50 IST