लोकमत न्यूज नेटवर्क बदनापूर : वधू-वरांना घेऊन जाणारी कार व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले. जालना-औरंगाबाद रस्त्यावरील देवगाव तांड्याजवळ सोमवारी सकाळी सहा वाजता ही घटना घडली. पोलीस सूत्रांनी सांगितले, की, यवतमाळ येथून वधू-वर कारने (एमएच.१५. ८८४२) नाशिककडे जात होते. बदनापूर तालुक्यातील देवगाव तांड्याजवळ दुचाकी (एमएच.२१,२४१६ ) व कारची धडक झाली. त्यामुळे कार तीन पलट्या घेत रोडच्या खाली जाऊन उलटली. यात कारमधील तीन जण जखमी झाले असून, त्यांची नावे कळू शकली नाही. दुचाकीवरील पवन राठोड व कैलास राठोड जखमी झाल्याची माहिती कॉन्स्टेबल ढिल्पे यांनी दिली. त्यांच्यावर जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी झालेल्या या अपघाताची पोलिसांना उशिरा माहिती मिळाली. स्थानिकांनी जखमींना रूग्णालयात हलविण्यास मदत केली. या अपघाताची बदनापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती.
नववधू-वराच्या कारला अपघात,पाच जखमी
By admin | Updated: June 27, 2017 00:52 IST