नांदेड : विविध प्रांतातील आंब्यांनी बाजारपेठ व्यापली असतानाच विदेशातील फळांनी नांदेडकरांना भुरळ घातली आहे़ अमेरिका, आॅस्ट्रेलिया, चीन, थायलंड येथील वेगवेगळ्या फळांची आयात नांदेडात होत असून या फळांचा अस्वाद ‘लय भारी’ असल्याचा प्रत्यय नांदेडकरांना येत आहे़ वैशाखातील उन्हाने हैराण झालेले नागरिक रसाळीवर ताव मारीत सुट्यांचा आनंद घेत आहेत़ सध्या बाजारपेठेत हापूससह लंगडा, दशेरी, बदामी, केशर, रसाळ आदी प्रजातींचे आंबे बाजारपेठे दाखल झाले आहेत़ टरबूज, खरबूज, चिकू, पपई, डाळींब, काकडी या फळांचीही रेलचेल वाढली आहे़ भारतीय फळांच्या सोबतीने विदेशातील वेगवेगळ्या फळांनीही लक्ष वेधले आहे़ यापूर्वी देशातील विविध प्रांतातून आलेल्या फळांचे अप्रूप सर्वांनाच असे़ परंतु आता सातासमुद्रापलीकडून फळांची आयात मोठ्या शहरात होत आहे़ मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या महानगरानंतर आता नांदेड मध्येही देश- विदेशातील फळांची विक्री होत आहे़ फळविक्रेते ेबारा महिने पिकणार्या फळांची आयात करून दुकाने सजविताना दिसत आहेत़ विशेषत: अमेरिकन पेर्स, अमेरिकन आॅरेंज, अमेरिकन गोड चिंच, टीव्ही फ्रुट, अमेरिकन ग्रेप्स, अमेरिकन अॅपल या फळांनी नांदेडकरांच्या घरात जागा मिळविली आहे़ शहरात विदेशी फळांची विक्री करणारे मोजकेच विक्रेते आहेत़ मुंबई येथून या फळांची आयात करण्यात येते़ या फळांकडे कुतुहलाने पाहणार्या नागरिकांना चवी बाबत मात्र संभ्रम होता़ परंतु प्रत्येक फळांचा अस्वाद चटका लावणारा असल्याने नागरिक या फळांची खरेदी करताना दिसत आहेत़ यासंदर्भात माहिती देताना वर्कशॉप येथील क्वॉलिटी फ्रुट शॉपचे मालक सय्यद चाँद म्हणाले, सध्या फळांचा मोसम आहे़ उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिक फळे खाण्यासाठी आग्रही असतात़ अशा वेळी विदेशातील फळांनी त्यांचे लक्ष वेधले आहे़ सध्या अमेरिकन पेर्स १८० रूपये किलो, आॅस्ट्रेलिया टीव्ही फ्रुट ३० रूपये नग, अमेरिकन आॅरेंज २०० रूपये डझन, अमेरिकन स्वीट चिंच ७० रूपये बॉक्स, ड्रायगन फ्रुट ३५० रूपये किलो, थायलंडचे जांब ३०० रूपये किलो, अमेरिकन ग्रेप्स ३०० रूपये किलो, आॅस्ट्रेलियन सेंडाऊन पेर १२० रूपये किलो, अमेरिकन अॅपल २०० रूपये किलो विकण्यात येत आहेत़ तसेच काश्मिरी चेरी फ्रुट २८० रूपये किलो, काश्मिरी कच्चे बादाम २०० रूपये किलो भाव आहे़
नांदेडकरांना विदेशी फळांचा मोह
By admin | Updated: May 11, 2014 00:38 IST