लासूर स्टेशन/ लिंबेजळगाव/लासूरगाव : अज्ञात वाहनाने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात लासूरगाव (ता. वैजापूर) येथील तीन जण जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावर घडला. या दुर्घटनेमुळे लासूरगावावर शोककळा पसरली आहे.साहेबराव चांगदेव शेजूळ (४८), मनोहर ऊर्फ सखाराम अंबादास काळे (५०), बाळू दामोदर नेटके (४५, सर्व रा. लासूरगाव) अशी मयतांची नावे आहेत. मयत झालेले तिघेही जीवलग मित्र असून तेऔरंगाबाद येथून काम आटोपून दोन मोटारसायकलवर घरी परतत होते. महामार्गावरील शिंदी शिरसगावजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात तिघेही जागीच ठार तर नवनाथ रामभाऊ नेटके जखमी झाले. मयत साहेबराव शेजूळ हे व्यापारी, मनोहर काळे हे लासूरगावचे ग्रा.पं. सदस्य व हॉटेल व्यावसायिक तर बाळू नेटके हे शेतकरी आहेत. घटना कुणाच्या हद्दीत आहे, यावरुन पोलीस ठाण्यात संभ्रम निर्माण झाल्याने घटनास्थळी शिल्लेगाव, दौलताबाद व वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. या सर्वांनी गावकºयांच्या मदतीने मृतदेह घाटी रुग्णालयात हलविले. फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. या अपघाताची वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष कसबे, जमादार वसंत जिवडे, एस.जी.जोगस आदींनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.आज अंत्यसंस्कारवैजापूर तालुक्यातील लासूरगाव येथे शनिवारी सकाळी १० वाजता तिन्ही जणांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मयत बाळू नेटके व जखमी झालेले नवनाथ नेटके हे चुलतभाऊ आहेत.
नागपूर -मुंबई महामार्गावर भीषण अपघातात तिघे जागीच ठार : लासूरगावावर शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:20 IST