औरंगाबाद : पत्नीचे अनैतिक संबंध तसेच तिचा प्रियकर आणि सासू याच्या त्रासाला वैतागूनच चिकलठाणा परिसरातील गोरक्षनाथनगरातील राम अहिरने आपल्या दोन चिमुकल्यांचा खून करून नंतर आत्महत्या केली. या हत्याकांडाला पत्नी, प्रियकर व सासूच जबाबदार आहे, अशी फिर्याद काल मयत रामच्या मुलीने दिली. त्यावरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पत्नी ज्योती राम अहिर (३२, रा. गोरक्षनाथनगर), सासू सखूबाई रामभाऊ ढोणे (६०, रा. गोरक्षनाथनगर) व संतोष काळे (रा. करमाड) या तिघांना अटक केली. राम अहिरने सोमवारी पहाटे आपल्या अंशुमन आणि वीर या दोन चिमुकल्या मुलांचा झोपेत असताना नाक- तोंड दाबून खून केला. नंतर चिकलठाणा परिसरातील एका झाडाला रामने फाशी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत ‘आपण पत्नीच्या अनैतिक संबंधाला वैतागलो आहोत. ती तिचा प्रियकर संतोष काळे आणि सासू आपल्याला धमक्या देतात, त्रास देतात’ असे लिहिले होते. या चिठ्ठीच्या आधारे रामच्या मुलीने आपल्या वडिलांच्या आत्महत्येस पत्नी, तिचा प्रियकर आणि सासूच जबाबदार आहे, अशी काल फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करताच या तिघांना अटक करण्यात आल्याचे सिडको एमआयडीसी ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले.
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळेच हत्याकांड
By admin | Updated: January 9, 2015 00:53 IST