लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरातील स्वच्छता प्रश्नावर महापालिका सोमवारी अक्षरश: कचरामय झाली. प्रारंभी शिवसेना नगरसेवकांनी महापौरांच्या कक्षात कचरा फेकला तर त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसने विरोधी पक्षाच्या कक्षात कचरा नेऊन फेकला. त्यानंतर सेनेने संपूर्ण महापालिकेत कचरा फेकून कचऱ्याच्या प्रश्नाची तीव्रता मांडली.शहर स्वच्छतेचे काम मार्चअखेर एटूझेडने सोडून दिल्यानंतर शहराला अक्षरश: कचऱ्याचे रुप आले आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. एप्रिल, मे, जून या महिन्यात कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. या प्रश्नावर महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रमोद खेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. एटूझेडने काम सोडताना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काम करावे, असे करारात नमूद असताना सत्ताधारी आणि प्रशासनाने ए टू झेडला काम सोडू कसे दिले? असा सवाल त्यांनी उपस्थित कला. येत्या आठ दिवसांत कचऱ्याचा प्रश्न न सोडविल्यास महापौरांच्या दालनाला कुलूप ठोकण्याचा इशाराही पत्रकार परिषदेत दिला होता. मात्र पत्रकार परिषद संपताच विरोधी पक्षनेते खेडकर यांच्यासह सेना नगरसेवकांनी आपला मोर्चा महापौर कक्षाकडे वळवला. महापौर कक्षात त्यांनी कचरा फेकून महापौरांच्या विरोधात घोषणाबाजी केली. काही कळायच्या आतच तेथे उपस्थित असलेल्या सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, उमेश पवळे, उमेश चव्हाण, माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी महापौर कक्षात शिवसेनेने फेकलेला कचरा उचलला अन् तोच कचरा विरोधी पक्षनेते प्रमोद खेडकर यांच्या कक्षात फेकला. शिवसेनेचे महानगराध्यक्ष महेश खोमणे, बालाजी कल्याणकर व इतर सेना सदस्यांनी काँग्रेस नगरसेवकांना विरोधी पक्षनेत्याच्या कक्षाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सेना- काँग्रेस नगरसेवकांत चांगलीच जुंपली होती़त्यानंतर उपमहापौर शफी अहेमद कुरेशी यांनी शिवसेनेने केलेला हा प्रकार म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले राजकारण असल्याची टीका केली. कचऱ्याचा प्रश्न गंभीर असला तरी तो सोडवण्यासाठी नगरसेवक म्हणून सर्वांनीच एकत्र येऊन मार्ग काढणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी तत्कालीन आयुक्त समीर उन्हाळे यांच्या असहकार्याच्या भूमिकेमुळे महापालिकेची अनेक कामे खोळंबल्याचा आरोपही त्यांनी केला. यानंतर नांदेड दक्षिणचे आ. हेमंत पाटील हेही महापालिकेत दाखल झाले. त्यांनी कचरा प्रश्नास सत्ताधारी काँग्रेस जबाबदार असल्याच आरोप केला. महापालिकेकडून पावसाळापूर्व कामे होणे आवश्यक असताना ती कामे झालीच नाहीत. शहरातील नाल्या तुंबलेल्याच आहेत. महापालिकेने येत्या दोन दिवसात कचऱ्याचे ढिगारे न उचलल्यास महापौरांच्या निवासस्थानावरही कचरा फेकण्याचा इशारा दिला़ विरोधी पक्षनेते खेडकर, महानगरप्रमुख खोमणे, तुलजेश यादव, विनय गुर्रम, बिल्लू यादव, बाळासाहेब देशमुख आदींची उपस्थिती होती.
महापालिका कचरामय
By admin | Updated: June 13, 2017 00:41 IST