भाड्याच्या गर्भाशयासाठी मुंबईकर औरंगाबादमध्ये

By संतोष हिरेमठ | Published: August 5, 2022 10:23 AM2022-08-05T10:23:03+5:302022-08-05T10:23:18+5:30

आठ महिन्यांपासून भाडोत्री गर्भाशय मिळणे थांबल्याचा दावा

Mumbaikars in Aurangabad for rent uterus for child birth | भाड्याच्या गर्भाशयासाठी मुंबईकर औरंगाबादमध्ये

भाड्याच्या गर्भाशयासाठी मुंबईकर औरंगाबादमध्ये

googlenewsNext

- संतोष हिरेमठ 
लोकमत न्यूज नेटवर्क   
औरंगाबाद : दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरांतून ‘गर्भाशय भाड्याने मिळेल का’ अशी विचारणा करीत अनेक जण औरंगाबाद गाठत आहेत. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून गर्भाशय भाड्याने देण्याचा ‘उद्योग’ बंद असल्याचा दावा केला जात आहे. कारण  नव्या सरोगसी ॲक्टनुसार अंमलबजावणी करण्यासाठी डिसेंबर २०२१ पासून सरोगसी मदर्स होणे थांबले आहे. सध्या सरोगसी मदरसंदर्भात उपचार करणाऱ्या केंद्रांची नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. यावर  आता महापालिकेच्या आरोग्य विभागाची देखरेख राहणार आहे. यामुळे सरोगसी मदर्स उपलब्ध करून देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.  

बाॅलिवूडमधील काही अभिनेत्रींनी ‘सरोगसी’च्या माध्यमातून आई होण्याचे सुख प्राप्त केले. ‘सरोगसी’ म्हणजे दुसऱ्या महिलेचे गर्भाशय भाड्याने घेऊन तिच्या मदतीने अपत्य जन्माला घालणे होय. ज्या दाम्पत्याला काही कारणांमुळे मूल होऊ शकत नाही, त्यांना या माध्यमातून मूल  प्राप्त होऊ शकते; परंतु ‘सरोगसी’ काहींसाठी ‘धंदा’ बनला आहे. 
सरोगेट मदर्स उपलब्ध करून देणाऱ्या एजन्सी उदयास आल्या होत्या; परंतु  नवीन ॲक्टच्या माध्यमातून त्यावर अंकुश लागला आहे.   

गर्भपिशवी काढलेली असेल, गर्भाशय आतून खराब असेल, गर्भ राहत नसेल तर, अस्तर खराब असेल तर 
अशावेळी सरोगसी मदरची मदत घेतली जाते.  दिल्ली, मुंबईच्या तुलनेत औरंगाबादला उपचार परवडणारे आहेत. 
- डाॅ. मनीषा काकडे, 
वंध्यत्व निवारणतज्ज्ञ  

औरंगाबादेत २० सेंटर्स
    सरोगसी मदर्ससंदर्भात उपचार करणारे औरंगाबादेत जवळपास २० सेंटर आहेत. 
    या सेंटरमध्ये केवळ उपचाराची जबाबदारी पार पाडली जाते. मात्र, दाम्पत्य आणि सरोगेट मदर्स तसेच एजन्सी यांच्यात होणारे आर्थिक व्यवहार या सेंटरबाहेरच होत असे, असे सांगण्यात आले. 
    प्रत्येकी एक सरोगसी मदर म्हटले तरी महिन्याकाठी, वर्षाकाठी हा आकडा, त्यातून होणारी आर्थिक देवाण-घेवाण ही जानेवारीपूर्वी किती होती, याचा अंदाज येतो. 

शासनच देईल मंजुरी 
ज्याप्रमाणे किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया होते, त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीत यापुढे ही सगळी प्रक्रिया होईल. सरोगसी मदर्स होण्यासाठी आता नातेवाईक, मैत्रीण असे लोक लागतील. 
 - डाॅ. अनुराधा शेवाळे, 
आयव्हीएफ कन्सल्टंट

अनेक दाम्पत्य प्रतीक्षेत
अनेक दाम्पत्य सरोगसी मदर्सच्या माध्यमातून आई-बाबा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु जानेवारीपासून सरोगसी मदर्स होणे थांबले आहे. देशभर हीच परिस्थिती आहे.   
- डाॅ. अपर्णा राऊळ, 
आयव्हीएफ स्पेशालिस्ट  

Web Title: Mumbaikars in Aurangabad for rent uterus for child birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.